शिरूरचा उमेदवार जातीच्या आधारे निवडला की मातीच्या? भाजपचा शरद पवारांना सवाल

मुंबई : शिरूर लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादीचा उमेदवार देताना शरद पवार यांनी जातीचा विचार केला की मातीचा? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विचारला.
लोकसभा निवडणुकीत आता जातीच्या आधारावर मते मिळणार नाहीत हे कळायला लागल्यानंतर जातीसाठी नाही तर मातीसाठी मतदान करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले असावे, असा टोलाही तावडे यांनी लगावला.
प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना तावडे म्हणाले की, जातीसाठी नाही तर मातीसाठी मतदान करण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे. पण पवार यांच्या तोंडी हे वाक्य ऐकल्यानंतर लोकांना माहित असते, त्यामागे त्यांचे म्हणणे काय आहे. पण शिरूरचा उमेदवार देताना काय विचार केला होता. मातीचा केला होता की जातीचा केला होता, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
अजित पवार यांनी आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये साम, दाम, दंड, भेद याचाच वापर केला आहे. गेल्या खेपेस लोकसभा निवडणुकीत त्यांची क्लिप वायरल झाली होती, त्यात ते काय बोलले होते ते त्यांनी जरा आठवून बघावे, विनाकारण दुस-यांवर आरोप करू नये, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.





