मुलं पळवणारी टोळी सक्रीय’, जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला
मुंबई : ‘काळजी घ्या…महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रीय झाली आहे’ असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला टोला लगावला आहे. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटीलने मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश भाजपाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सुजयने भाजपामध्ये प्रवेश केला. नगर दक्षिणच्या उमेदवारीसाठी सुजय विखे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली असून, त्यांच्या नावाला श्रेष्ठींची मान्यता मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सुजय विखे नगर दक्षिणच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. त्यांनी त्यासाठी बांधणीही सुरु केली होती. मात्र नगर दक्षिणची जागा काँग्रेस आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. ती जागा काँग्रेसला सोडली जाईल अशी आशा होती. मात्र सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर दक्षिणेची जागा आपलीच आहे, असा दावा केला होता. त्यानंतर सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचालींना वेग आला. सुजय विखे यांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र ते फोल ठरले. आणि मंगळवारी सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1105382005548699648





