दोन किमीची अट राज्य सरकारकडून रद्द

मुंबई : कोरोना विषाणूचा झपाट्याने शहरात फैलाव होत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्याची मुभा देण्यात आली होती. दोन किमी परिसरात नागरिकांनी खेरदी करावी, अशी अट लागू करण्यात आली होती. मात्र, विरोधानंतर घरापासून दोन किलोमीटर परिसरातच प्रवासमुभा देण्याबाबत फेरविचार करुन लागू करण्यात आलेली अट रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी ही अट रद्द करून घराजवळच खरेदी करण्याचे आवाहन केले. पोलिसांनाही त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दोन किलोमीटरच्या क्षेत्रात मुंबई पोलिसांच्या आदेशानंतर विनाकारण बाहेर पडणे शक्य होत नव्हते. कंटेन्मेंट झोन असल्याने कडक निर्बंध होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी अनेकांचा विरोध असल्याचे सांगितले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पोलिसांच्या या कृतीबद्दल आक्षेप घेतल्यावर घराजवळच खरेदी करा, असे आवाहन मुंबई पोलीस आयुक्तांनी केले, तर दोन किमीची अट रद्द केल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुंबईत घरापासून दोन किमीच्या आत प्रवासास मुभा देणे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता वाहन चालकांच्या विरोधात कारवाई करणे यावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत पवार यांनी शुक्र वारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. राजकीय गोंधळामुळे ही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.





