ठाण्यातील शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची ठाण्यात गोळ्या झाडून हत्या
ठाणे – ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक माणिक पाटील यांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करुन मृतदेह वाशीच्या खाडीत टाकण्यात आला असल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. तसेच माणिक पाटील यांच्या घरातील साडेतीन किलो सोन्याचे दागिनेदेखील चोरीला गेले आहेत.
ही हत्या माणिक पाटील यांचा सावत्र मुलगा सचिन पाटील याने संपत्तीच्या वादातून केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा प्रकार माणिक पाटील यांच्या वाहन चालकाला ताब्यात घेतल्यानंतर उघडकीस आला असून मुख्य संशयित आरोपी सचिन पाटील फरार आहे. त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. तसेच मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राकेश माणिक पाटील (३४) असे हत्या करण्यात आलेल्या नगरसेवक पुत्राचे नाव आहे.
शिवसेनेचे नगरसेवक माणिक पाटील हे ठाण्यातील घोडबंदर रोड येथे राहण्यास आहेत. तर राकेश जवळच असणाऱ्या शिवसृष्टी इमारतीत राहण्यास होते. २० सप्टेंबर रोजी रात्रीपासून बेपत्ता असणाऱ्या राकेश पाटील यांचा मोबाईल फोन बंद लागत असल्यामुळे माणिक पाटील यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. राकेशचा शोध सुरू असताना माणिक पाटील यांच्या बंगल्यातील साडेतीन किलो सोन्याचे दागिने गायब असल्याचे माणिक पाटील यांच्या लक्षात आले. नगरसेवक पाटील यांनी याप्रकरणी पोलिसांना कळवले. मुलगा आणि सोने गायब झाल्यामुळे कासारवडवली पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन कासारवडवली पोलिसांचे एक विशेष पथक राकेशच्या शोधासाठी तयार केले होते.
राकेशचा शोध सुरू असताना त्याची मोटारसायकल माणिक पाटील यांचा वाहन चालक गौरव सिंह याच्याकडे पोलिसांना सापडली. पोलिसांनी संशयावरून गौरव सिंह याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करताच त्याने राकेशची हत्या करून मृतदेह वाशीच्या खाडीत फेकला असल्याची कबुली दिली. सचिन पाटील हा राकेशचा सावत्र भाऊ असून त्याने बंगल्याच्या वाटणीवरून राकेशची गोळ्या झाडून हत्या केली, त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून मृतदेह वाशीच्या खाडीत फेकला असल्याची कबुली गौरव सिंह याने पोलिसांनी दिली आहे.





