घाटकोपरमधील तरुणाची हत्या : पोलीस उपनिरीक्षकासह पाच जणांना अटक
मुंबई: दुचाकी बाजूला घेण्यावरून घाटकोपर येथे बुधवारी रात्री पाच जणांनी एका तरुणाला नाल्यात ढकलून देत, त्याची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दापोली येथून पाचही जणांना अटक केली असून यामध्ये एका निलंबित पोलीस उपनिरीक्षकाचादेखील समावेश आहे.
घाटकोपरच्या साईनाथ नगर येथे बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. यामध्ये गणेश मस्के (वय २२) या तरुणाची हत्या करण्यात आली. याप्रकरणात दापोली येथून शाम अहिरे (३५) या निलंबित पोलीस उपनिरीक्षकासह वैभव क्षीरसागर (३५), तुषार बनकर (३६), प्रवीण राणे (५६), नीलेश गुरव (३५) यांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली. चौकशीत या सर्वानी गुन्ह्य़ाची कबुली दिली आहे. शाम अहिरे हा खैरवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्याला चार महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केली होती. तेव्हापासून तो निलंबित होता. न्यायालयाने त्यांना २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.





