गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी वाहनांचे ई-पास आता सहज उपलब्ध
मुंबई – कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत राज्याअतंर्गत प्रवासासाठी ई-पास आवश्यक आहे. ई-पासशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यावर बंदी आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात विनाकारण प्रवास करणे त्यामुळे शक्य नाही. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. हीच बाबत लक्षात घेत मुंबई पोलिसांनी ई-पास काढण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करताना गणेशोत्सवाचाही पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
अत्यावश्यक सेवा, नातेवाईकांच्या मृत्यूसंबंधी प्रवास, वैद्यकीय कारण किंवा इतर महत्त्वाच्या कारणांसाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी परवानगी मिळत आहे. आता यामध्ये गणेशोत्सवाचा पर्यायही सामील करण्यात आला आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी खासगी वाहनांना लागणारे ई-पास आता सहज उपलब्ध होतील. मुंबईतील नागरिकांनी https://mumbaipolice.co.in/ या लिंकवर क्लिक करून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





