केमिकलमुळे डोंबिवलीतील रस्ते झाले गुलाबी…मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल…

मुंबई | महाईन्यूज |
डोंबिवली एमआयडीसीतील प्रदूषणामुळे डोंबिवलीकरांचे जगणे कठीण झाले आहे. डोंबिवलीमध्ये केमिकलमुळे हिरवा पाऊस, नारंगी पाऊस पडल्याचे आपण पाहिले आहे. पण आता चक्क केमिकलमुळे डोंबिवलीतील रस्ते गुलाबी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर, याप्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.


केमिकलमुळे बुधवारी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सर्वच रस्ते गुलाबी झाले आहेत. तसंच हा गुलाबी रंग आसपासच्या परिसरातील रस्त्यांवर देखील पहायला मिळाला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याचेही दिसून आले. या केमिकलमुळे डोळे चुरचुरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.


दरम्यान, याप्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. याप्रकरणाचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ बैठकीत दिले. तसंच, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली एमआयडीसी परिसरात जाऊन पाहणी केली. तसंच, एमआयडीसी, एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या





