काँग्रेस – राष्ट्रवादीच्या बैठकीत लोकसभा मतदार संघनिहाय आढावा

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली.
राज्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय यावेळी चर्चा करण्यात आली. मतदारसंघाच्या वाटपाबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ही केवळ प्राथमिक चर्चा आहे. अन्य समविचारी पक्षांचाही आम्ही विचार करणार आहोत, अशी माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, विजय वडेट्टीवार, नसीम खान, शरद रणपिसे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्यात एकमत झाले आहे. मात्र ही आघाडी करताना ती कशी असावी यावर सध्या चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीसाठी ५०-५० टक्केचा फॉर्म्यूला काँग्रेस पक्षाला दिला आहे. तसेच काही समविचारी पक्षांना आघाडीत घ्यायचे झाल्यास त्यांच्यासाठी आमच्या कोट्यातून काही जागा सोडू असा प्रस्ताव दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे, औरंगाबादसह तीन-चार जागा बदलून हव्या आहेत तर काँग्रेसला दक्षिण अहमदनगर, दिंडोरी, यवतमाळ यासारख्या जागा हव्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने २६ जागा लढविल्या होत्या तर राष्ट्रवादीने २२ जागा लढवल्या होत्या. यात काँग्रेसला परभणी व नांदेड अशा केवळ दोनच जागा जिंकता आल्या होत्या. तर, राष्ट्रवादीला चार जागा जिंकता आल्या होत्या. राष्ट्रवादीने या चारही जागा पश्चिम महाराष्ट्रातीलच म्हणजे बारामती, माढा, सातारा व कोल्हापूर जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीला उर्वरित मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात भोपळाही फोडता आला नव्हता.





