TOP Newsताज्या घडामोडीपुणे

दस्त नोंदणी करताना होणाऱ्या चुका टळणार

पुणे : दस्त नोंदणी करताना नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक नागरिक किंवा कर्मचाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने नोंदवला जातो. त्यामुळे संबंधितांच्या सातबारा अथवा मिळकत पत्रिकेवर नोंद करताना चुका होतात. त्यामुळे नागरिकांना भविष्यात याबाबतीत होणारा त्रास टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यानुसार दस्त नोंदणी करताना माहिती भरण्याच्या प्रणालीत बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्याकरिता नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक आणि जमाबंदी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दस्तनोंदणी प्रक्रिया सुधारण्याबाबत अभ्यास करून मार्गदर्शन करणार आहे.

दस्त नोंदणीसाठी ‘आय सरिता’ ही प्रणाली नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आधीपासूनच उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीत सुरुवातीला दस्ताची माहिती भरण्यात येते. मात्र, अनेक वेळा खरेदी-विक्री करणारे मोबाइल क्रमांक किंवा ई-मेल आयडी भरत नाहीत, दस्त नोंदणीसाठी मदत करणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक देतात. यामुळे ई-फेरफार तयार झाल्यानंतर त्याची माहिती खरेदीदार आणि विक्रेत्यांना लघु संदेशाद्वारे (एसएमएस) मिळत नाही. त्यामुळे फेरफार वेळेत मंजूर होत नाही. या चुका टाळण्याचा उद्देशाने ही समिती ‘आय सरिता’ प्रणालीचा अभ्यास करत आहे.

माहिती अचूक कशी भरावी याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येत आहे. त्यामुळे दस्तनोंदणीनंतर ई-फेरफार प्रणालीद्वारे खरेदीदार व विक्रेत्यांना ऑनलाइन नोटीस जातील. तसेच सातबारा उताऱ्यावर खरेदीदाराचे नाव येण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.नोंदणी व मुद्रांक शुल्क, भूमी अभिलेख आणि महसूल विभाग हे सर्व एकमेकांशी पूरक आहेत. प्रत्येकाची संगणक प्रणाली वेगळी आहे. त्यामुळे एकीकडे चूक झाली, तर ती दुरुस्त करताना नागरिकांना अडचण येते. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची पब्लिक डाटा एण्ट्री (पीडीई) या संगणकीय उपयोजितामध्ये (वेब ऍप्लिकेशन) चुकीची माहिती भरल्यास ई-म्युटेशन करताना चुका होतात. त्यामुळे दस्त नोंदणीच्या चुका टाळण्यासाठी काय दुरुस्त्या करता येतील, यावर विचार करण्यासाठी ही समिती काम करत असल्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

समितीमध्ये कोण-कोण ?

राज्य सरकारकडून जमिनींना भू-आधार क्रमांक दिला जातो; परंतु हा क्रमांक देताना एकाच नावाच्या दोन व्यक्ती अशा आशयाच्या चुका निर्दशनास आल्या आहेत. त्यामुळे विनाकारण एकाच व्यक्तीची अनेक खाते पुस्तिका तयार झाल्या आहेत. या चुकांमुळे एखाद्या व्यक्तीला जमिनीची माहिती हवी असल्यास अडचण येते. या चुका दुरुस्त केल्यानंतर ऑनलाइन सातबारा उतारा, फेरफार उतारा किंवा मिळकत पत्रिकेवर जागा मालकांची अचूक माहिती भरली जावी या हेतूने ही समिती स्थापन केली आहे. या समितीत नोंदणी विभागातील दुय्यम निबंधक, तलाठी, मंडल अधिकारी, नगरभूमापन अधिकारी, ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक तसेच विभागाचे तांत्रिक अधिकारी यांचा समावेश आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button