breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“कदाचित आशिष शेलार यांना शांत करण्यासाठी….,” देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर गंभीर आरोप

मुंबई |

शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासंबंधी केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात भाजपा आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे भाजपा आक्रमक झाली आहे. सकाळीच भाजपा कार्यकर्त्यांनी आशिष शेलार यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसंच मरिन ड्राईव्ह पोलीस स्थानकाबाहेरही समर्थकांनी गर्दी केली असून आंदोलन केलं जात आहे. यादरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी शिवसेनेवर टीका करत गंभीर आरोप केले आहेत. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“भाजपाचा कोणताही नेता आणि विशेषत: आशिष शेलार हे कोणत्याही महिलेबद्दल अभद्र किंवा चुकीचा शब्द वापरु शकत नाहीत, महापौरांबद्दल तर अजिबात नाही. काल त्यांची पत्रकार परिषद किंवा प्रेस नोट याचा चुकीचा अर्थ काढून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकतेने बोलतात म्हणून त्यांना शांत करण्यासाठी कदाचित गुन्हा दाखल झाला का हा देखील एक प्रश्न आहे,’ अशी शंका देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केली आहे. “महापौर किंवा कोणत्याही महिलेबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. त्यामुळे आशिष शेलार किंवा भाजपा कोणीही त्यांच्याबद्दल वाईट किंवा चुकीचे शब्द वापरु शकत नाही,” असंही ते म्हणाले.

  • आशिष शेलारांची टीका

“ही तक्रार खोटी, गुन्हा खोटा, कायदेशीर प्रक्रिया खोटी. या राज्यात पोलीस बळाचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग केवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो, याचं हे जिवंत उदाहरण आहे. मी कोणत्याही महिलेबाबत, महापौरांबाबत, कोणत्याही व्यक्तीबाबत अपमानास्पद, बदनामीकारक वक्तव्य, छेडछाड किंवा कोणताही गुन्हा केलेला नाही. सातत्याने दोन दिवस वेगवेगळ्या पोलीस स्थानकात दबावतंत्र करून, सत्तेचा दुरुपयोग करून हा खोटा गुन्हा दाखल केला आहे”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

  • सत्य बाहेर येईलच, पण…

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना यांचं नाव न घेता त्यांना आव्हान दिलं आहे. “सत्य बाहेर येईलच. पण अशा पद्धतीची मुस्कटदाबी आणि दादागिरी करणाऱ्यांना मी एवढंच सांगेन की भाजपा कधी दबला नाही, झुकला नाही. आशीष शेलारचा तर सवालच नाही. तुमच्या नाकर्तेपणाविरुद्धचा संघर्ष अजून कडवा, प्रखर करीन आणि जनतेला न्याय देण्याची भूमिका सातत्याने चालू ठेवेन”, असं ते म्हणाले.

  • काय आहे वाद

वरळीच्या बीडीडी चाळीतील दुर्घटनेनंतर आशीष शेलार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिथे सिलिंडरचा स्फोट होऊन चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आणि पाठोपाठ त्याच्या वडिलांनाही प्राण गमवावे लागले. मुंबईच्या महापौर मात्र ७२ तास उलटल्यानंतर रुग्णालयात पोहोचल्या. याच मुद्द्यावरुन शेलार यांनी महापौरांना लक्ष्य केले होते. नायर रुग्णालयात गेलेल्या जखमींना तब्बल ४५ मिनिटे उपचारांविना तसेच ठेवले गेले. त्यांच्यावर औषधोपचार नाही किंवा विचारपूसही करण्यात आली नाही. या बेफिकिरीमुळे चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला, असे नमूद करत शेलार यांनी महापौरांवर टीका केली होती.

आशिष शेलार म्हणाले होते, “७२ तास तुम्ही का पोहचला नाही? करून दाखवलं म्हणता ना, मग कुठं निजवून दाखवलं होतं? झोपला कुठं होतात? झोपला कुठं होतात या अर्थाने मी हा शब्द वापरतो आहे. निजणं म्हणजे झोपणं. या अर्थाने झोपला कुठं होतात हा प्रश्न विचारला तर यात गैर काय?”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button