breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणे

महेशदादांनी मराठा आंदोलकांवरील हल्ल्याबाबत देखील तत्परता दाखवावी : प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे

मराठा आंदोलन वरील लक्ष विचलित करण्यासाठीच आमदारांची तत्परता

पुणे : पुण्येश्र्वराच्या शेजारील मस्जिद हटवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील आमदार महेशदादा लांडगे यांनी काल पुणे येथे तत्परतेने जाऊन भूमिका घेतली. सोबत काही वर्षांपूर्वी मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांची जात काढणारे नीतेश राणे देखील होते. सत्तेतले आमदार असुन देखील प्रशासनाला रीतसर ताकीद द्यायची सोडून घोडे लावायची धमकी दादांनी दिली. मात्र तेवढ्याच तत्परतेने दादांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा बांधवांवर केलेल्या अमानुष हल्ल्यावर रस्त्यावर उतरून निषेध करण्याचं सोडा, साधी सोशल मीडियावर निषेधाची किंवा दिलगिरीची पोस्ट केली नाही की दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जेव्हा गुजराती-राजस्थानी माणसाला मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबईत पैसा उरणार नाही’, समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?, शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत’ अशी वक्तव्ये केली, महात्मा फुले आणि सावित्रीबाईं बद्दल वादग्रस्त विधान केले तेव्हा सुद्धा पिंपरी चिंचवड शहरातील शिवप्रेमींना दादांची तत्परता पहायची होती. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या होत्या, असे विधान ९ डिसेंबर २०२२ रोजी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी करून बहुजनांच्या नायकांचा अपमान केला तेव्हा देखील शहरातील बहुजनांना दादांची तत्परता पहायची होती. त्या वेळी मात्र ती दिसली नाही. किमान दिलगीरी किंवा आपल्या नेत्यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही एवढी तरी पोस्ट करायची होती. ती पण दादांना जमली नाही. त्यानंतर लगेच येणाऱ्या नानासाहेब पेशव्यांच्या जयंती निमित्त अभिवादन मात्र दादांनी आठवणीने केले.

आपण ज्या पुरोगामी पक्षातून राजकारणाची सुरुवात केली, तो वैचारिक वारसाच दादा सत्तेच्या लालसेपोटी विसरून बसलेत. २०१८ मध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या काळात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएसने विश्व हिंदू परिषद, हिंदू जनजागृती आणि सनातन संस्थेचे काम करत असलेल्या वैभव राऊतच्या घरी धाड टाकून स्फोटकं पकडली होती. त्यावेळी वैभव राऊत सोबत अजुन ११जणांना अटक केली होती. त्यावेळेस सापडलेली स्फोटके मराठा क्रांती मोर्चा उधळण्यासाठी वापरली जाणार होती असे आरोप झाले होते. त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील जे आता दादांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी सनातनवर बंदीची मागणी केली होती. त्याच संघटनांच्या परिवाराशी निगडीत मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेंना शहरात आणून दादांनी त्यांची मिरवणूक काढली.

आज राज्यभरातून देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राज्यात मराठा सामजाचा आक्रमक पवित्रा ,रोष आणि राजीनाम्याची मागणी यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आपल्या नेत्याच्या सांगण्यावरून दादांनी मात्र तत्परता दाखवली. पण आपल्या नेत्याला खूष करण्याच्या नादात आपण आपल्याच मराठा बांधवांच्या आंदोलनाला नख लावत आहोत, हे दादांच्या लक्षात येवू नये हिच मराठ्यांची शोकांतिका. एखादं राज्यमंत्री पद मिळेल या आशेने पुरोगामी विचारांची होळी करून हिंदुत्ववादाकडे दादा सरकले. ते त्यांना मिळालं तर लखलाभ लाभो. पण त्याच्या नादात आपल्या गरीब मराठा बांधवांना हलाखीच्या गुलामगिरीतून बाहेर काढणाऱ्या आंदोलनाच्या मार्गावर दादा तूम्ही असं आडवं येवून आंदोलन विचलित करण्याचा प्रयत्न करायला नको होता, असेही सुनिल गव्हाणे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button