भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
सीसीटीव्हीत उघडकीस आला भीषण प्रकार; अवघ्या १५ मिनिटांत जीव गेला
पिंपरी-चिंचवड: पुणे जिल्ह्यातील चाकण येथे भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ३२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास आंबेठाण चौक परिसरात घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शोभा विजय वाघमारे असे मृत महिलेचे नाव असून त्या सध्या चाकण परिसरात वास्तव्यास होत्या.
हेही वाचा- भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे–हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला!
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शोभा वाघमारे या आंबेठाण चौकातील उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरून पायी जात होत्या. त्याच वेळी परिसरात फिरत असलेल्या सहा ते सात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने त्यांना अचानक घेरले. काही क्षणांतच कुत्र्यांनी त्यांच्यावर झडप घालत भीषण हल्ला चढवला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे त्या पूर्णपणे गोंधळून गेल्या. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते की, शोभा वाघमारे यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी धाडसाने प्रयत्न करत रस्त्यावरील दगड उचलून कुत्र्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांची संख्या अधिक असल्याने आणि ते आक्रमकपणे हल्ला करत असल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि कुत्र्यांच्या झुंडीसमोर त्यांचा निभाव लागला नाही.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
या हल्ल्यात कुत्र्यांनी त्यांच्या हात, पाय, तोंड तसेच मानेवर अत्यंत गंभीर चावे घेतले. परिणामी त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. या अत्यंत भीषण आणि भयावह हल्ल्यात अवघ्या १५ मिनिटांच्या आतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, सकाळच्या वेळी परिसरात विवस्त्र अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने सुरुवातीला स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. मृतदेहाची अवस्था पाहता सुरुवातीला हा खून किंवा एखाद्या प्रकारचा अत्याचार असू शकतो, असा संशयही काहींनी व्यक्त केला होता.
मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तपासात स्पष्ट झाले की, शोभा वाघमारे यांचा मृत्यू हा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळेच झाला आहे. या घटनेनंतर चाकण औद्योगिक वसाहत तसेच शहर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याची नागरिकांची तक्रार पुन्हा एकदा समोर आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.





