पालिका निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र? चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं ‘हे’ उत्तर

Chandrashekhar Bawankule : राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी प्रशासनासह सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. या निवडणुका स्थानिक स्तरावर होत असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. आता या निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महत्वाचे विधान केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, ‘राज्यातील सर्व निवडणुका आम्ही एकत्र महायुती म्हणून लढणार आहोत. याबाबतचे आदेश आम्ही पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. आमचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते एकमेकांची याबाबत चर्चा करत आहेत. मात्र जर एखाद्या ठिकाणी एखाद्या जागेवरून वाद निर्माण झाला तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल. मात्र इतर ठिकाणी युतीत निवडणुका लढल्या जातील, त्यामुळे संभ्रम बाळगण्याची गरज नाही.’
आगामी निवडणुकांमधील युतीबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले की, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार आहोत, शक्य असेल तिथे युती केली जाईल. मात्र शक्य नसेल तिथे आपण आपल्या ताकदीवर लढू, यासाठी कार्यकर्त्यांना आतापासूनच तयारीला लागलं पाहिजे.’
हेही वाचा – तत्काळ तिकीट काढण्यासाठी ‘ओटीपी’ आवश्यक, १ जुलैपासून आधार प्रमाणित वापरकर्त्यांना तिकिटे काढता येणार
भाजप महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याच्या बावनकुळेच्या विधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे. फडणवीस म्हणाले की, ‘आमची भूमिका पक्की आहे, महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढणार आहोत, मात्र एखाद्या ठिकाणी जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल.’
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. अलीकडेच राज्य सरकारने महापालिकांना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता प्रशासनाकडूनही या निवडणुकांची तयारी केली जात आहे. त्यामुळे या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.