“खचून जाणाऱ्यातले आपण नाही, मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं”; मुंबई महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची भावुक पोस्ट

Raj Thackeray : राज्यभरात प्रचंड राजकीय प्रतिष्ठेच्या बनलेल्या, अत्यंत चुरशीने लढवल्या गेलेल्या २९ महापालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणावरील सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले. विशेषत: सत्ताधारी महायुतीचे नेतृत्व करणाऱ्या भाजपचे राजकीय स्थान आणखी भक्कम बनले. प्रमुख शहरांचा कारभार हाती येणार असल्याने महापालिका निवडणुकांना मोठे महत्व प्राप्त झाले.
मुंबई महापालिकेच्या महापौरपदी पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार आहे. फक्त BMC च नाही, तर महाराष्ट्रातील 29 पैकी 25 महापालिका जिंकून भाजपने ठाकरे बंधुंसह संपूर्ण विरोधी पक्षाला हरवलं. महापालिका निवडणूक निकालाची सर्वात मोठी बाब म्हणजे 25 वर्षानंतर येथे शिवसेनेचा किल्ला ढासळला आहे. तर राज ठाकरे यांची मनसे दोन आकडी जागाही मिळवू शकली नाही.
या निकालानंतर राज ठाकरे यांनी निवडणूक ही सोपी नव्हती, असे म्हणत मनसैनिकांचे मनोबल वाढवले आहे. राज ठाकरे यांनी पोस्ट करत लिहिले की, “सस्नेह जय महाराष्ट्र, सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
हेही वाचा – 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.
आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच.
तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! !, ” असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.





