ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

विषारी दारू प्रकरणातील दोषींवर मोक्का; मृतांच्या सर्व २२ कुटुंबांना प्रत्येकी ५ लाखांची मदत

आमदार अमित गोरखे यांच्या लक्षवेधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लिखित उत्तर; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात केली महत्त्वपूर्ण घोषणा

मुंबई | पुणे व पिंपरी-चिंचवडमधील दापोडी, फुगेवाडी आणि हडपसर परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी विषारी दारू प्रकरणावर आमदार अमित गोरखे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे प्रकाश टाकला.. या गंभीर विषयाची दखल घेत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर लिखित उत्तर सभागृहात सादर केले असून त्यावर गृहराज्यमंत्री मा. नामदार योगेश कदम यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करत कठोर कारवाई व महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली.

आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत, मिथेनॉल पुरवठा साखळीचा संपूर्ण तपास आणि राज्यातील अवैध दारू व्यवसायाविरोधात व्यापक मोहीम राबविण्याची मागणी केली. त्यांच्या या मागण्यांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लिखित उत्तरामध्ये तपासाची सद्यस्थिती, दोषींवरील कारवाई तसेच भविष्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लिखित उत्तरानुसार या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून विषारी दारू निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या मिथेनॉलचा पुरवठा करणाऱ्या मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात सांगितले की, या प्रकरणातील मुख्य आरोपींवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही आणि संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

हेही वाचा

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘स्विच रायफल शूटिंग रेंज व पिस्टल सुविधा’चे उद्घाटन शालेय

याशिवाय विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या सर्व २२ कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून एकूण १ कोटी १० लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. पीडित कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी शासनाने ही मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लिखित उत्तरात राज्यभर अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले असून तालुकास्तरीय दारूबंदी समित्यांचे पुनर्गठन, पोलिस व उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाया आणि मिथेनॉलच्या वाहतुकीवर अधिक कठोर नियंत्रण ठेवण्याबाबत शासनाने ठोस पावले उचलल्याचे नमूद केले आहे.

यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले, “विषारी दारूमुळे २२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू ही अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक घटना आहे. मृतांच्या कुटुंबांना न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मी सभागृहात ठाम भूमिका मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत लिखित उत्तराद्वारे कठोर कारवाई व मदतीबाबत भूमिका स्पष्ट केली असून शासनाने घेतलेले निर्णय पीडित कुटुंबांसाठी दिलासादायक आहेत.”

पुढे आमदार अमित गोरखे म्हणाले, “दोषींना शिक्षा होईपर्यंत आणि पीडितांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच राहील. राज्यातील अवैध दारू व्यवसायाचे संपूर्ण उच्चाटन व्हावे यासाठी शासनाने सातत्याने कठोर भूमिका घ्यावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button