मराठा आरक्षण, सर्वाेच्च न्यायालय सुनावणी जानेवारीत होणार

मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 22 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
राज्य सरकारने आज होणाऱ्या सुनावणीसाठी माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या नेतृत्वाखाली विधिज्ञांची नेमणूक केली होती. राज्य सरकारची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली होती. मुकुल रोहतगी आणि संदीप देशमुख यांनी बाजू मांडली. रजिस्टरकडे प्रोसेस पूर्ण करा असे न्यायालयाने सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत आज सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज्य शासनाने नियुक्त केलेले माजी ऍटर्नी जनरल व ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. रोहतगी यांच्याबरोबरच ज्येष्ठ विधिज्ञ परमजितसिंग पटवालिया, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी, राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात नियुक्त केलेले विधिज्ञ निशांत कटणेश्वरकर, राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन, मुंबई उच्च न्यायालयातील विधिज्ञ ऍड. सुखदरे, ऍड. अक्षय शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड, विधी व न्याय विभागाचे सचिव (विधी विधान) राजेंद्र भागवत, सहसचिव गुरव या सर्वांनी साह्य केले.





