यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे!
पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मनीष रानवडे यांचे प्रतिपादन
उच्च ध्येय, अपार कष्ट करण्याची जिद्द तसेच कितीही अपयश आले तरी खचुन न जाता प्रमाणिक प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते. प्रयत्नातील सातत्य व मेहनतीवर उज्ज्वल यशाचे शिखर गाठता येते. खेळामुळे खेळाडूच्या अंगी चपळता, अचुकता व चांगली निर्णय क्षमता वाढते. तसेच मेहनतीला जिद्द आणि चिकाटी असेल तरच खेळाडू यशाचे शिखर गाठू शकतो. खेळाडूंनी यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे असे प्रतिपादन पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मनीष रानवडे यांनी केले.
दसऱ्या निमित्त आदिनाथ क्रिकेट क्लब, भोसरी वतीने मैदानाचे व साहित्याचे पूजन जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मनीष रानवडे, मुंबई येथील न्यायाधीश संजय जगदाळे यांचा हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी न्यायाधीश संजय जगदाळे, सुधीर परांजपे, भरत भिलोरे, हरिष बाबुलकर, रवी खंडाळीकर, आशुतोष सिंग, श्रेयश जगदाळे, यश खडके,बालाजी मगर व खेळाडू उपस्थित होते. न्यायाधीशपदी निवड झाल्याने क्लबचे अध्यक्ष संजय जगदाळे यांना मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. खेळाडूंनी स्पर्धेची तयारी करताना नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. ध्येय बाळगा आणि त्या ध्येययाचा पाठलाग करा. सरावात सातत्य ठेवा आपणास भविष्यात नक्कीच यश प्राप्त होईल असे खेळाडूंना मार्गदर्शन न्यायाधीश जगदाळे यांनी केले.. कार्यक्रमाची सूत्रसंचालन खेळाडू श्रीराज सूर्यवंशी यांनी तर आभार नीरज गुंजाळ यांनी मानले





