“हे सरकार कॉन्ट्रॅक्टर धार्जिण”; शक्तीपीठ महामार्गावरून सतेज पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

Satej Patil : नुकतीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वकांशी अशा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाला ज्या भागातून हा महामार्ग जात आहे, तेथील काही शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. महामार्गाला विरोध असूनही भूसंपादनाचा घाट कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील तीव्र विरोध दर्शविला आहे. अशातच आता काँग्रेसचे बंटी उर्फ सतेज पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक ऑनलाईन घेणार आहोत. यामध्ये पुढील रणनीती ठरवून महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
हे सरकार कॉन्ट्रॅक्टर धार्जिण असल्याचा हल्लाबोल सतेज पाटील यांनी सरकारवर केला असून, शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची भूमिका तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. आता मात्र, ही घोषणा मतांसाठी होती का? असा सवालही त्यांनी सरकारला केला आहे.
हेही वाचा – दुचाकीस्वारांसाठी मोठी बातमी! दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही
गरज नसलेला हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारू नका, असे देखील पाटील म्हणाले आहेत. निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही, यादी अधिसूचना निघाली होती. ती रद्द करून पुन्हा काढली अशी माहिती असल्याचे पाटील म्हणाले. तसेच हा केवळ कोल्हापूर जिल्ह्याचा प्रश्न नसून बारा जिल्ह्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.
हसन मुश्रीफ आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मंत्रिमंडळातील भूमिकेवर सतेज पाटील यांनी साशंकता व्यक्त केली. कॅबिनेट बैठकीत त्यांनी विरोध दर्शवला की नाराजी दर्शवली याबाबत आम्हाला माहिती नाही. मात्र, त्यांची भूमिका स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.