भटके-विमुक्त समाज म्हणजे अनुभवसिद्ध उपनिषदांचा खजिना : गिरीश प्रभुणे
तळेगाव दाभाडे येथे गिरीश प्रभुणे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार समारंभ संपन्न

तळेगाव दाभाडे : “भटके-विमुक्त समाज हा भारताच्या अनुभवसिद्ध ज्ञानाचा प्रचंड खजिना आहे. त्यांच्या जीवनपद्धतीत, भाषांमध्ये, परंपरांमध्ये उपनिषदासारखी सखोलता आहे. प्रत्येक जमातीचा इतिहास लिहिला, तर ज्ञानाच्या शेकडो उपनिषदांची निर्मिती होऊ शकते,” असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक व लेखक गिरीश प्रभुणे यांनी केले.
श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालय, तळेगाव दाभाडे यांच्या वतीने आयोजित अमृतमहोत्सवी गौरव समारंभात प्रभुणे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दिवेकर यांनी प्रभुणे यांच्या सामाजिक कार्याचा प्रदीर्घ आणि प्रेरणादायी प्रवास प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून उपस्थितांसमोर उलगडला.
समाजमनाला भिडणारा अनुभवसिद्ध प्रवास
गिरीश प्रभुणे यांनी ‘असीधारा’ या सामाजिक साप्ताहिकापासून सुरु झालेल्या प्रवासात ‘माणूस’ मासिकात लेखन, ‘ग्रामायन’ विशेषांकासाठी शंभर पानी स्वतंत्र लेखन, गावोगाव प्रत्यक्ष वास्तव्य करून अनुभवलेली जीवनशैली आणि त्या अनुभवावर आधारित सामाजिक समरसतेचे कार्य अधोरेखित केले.
हेही वाचा – राज्यातील वीज ग्राहकांना सरसकट दिलासा
विशेषतः फासेपारधी, नंदीबैलवाले, गोंधळी, मरीआई पूजक यांसारख्या समाजांसोबत अनेक वर्षं राहून त्यांनी त्यांचे ज्ञान, कौशल्य आणि संघर्ष जवळून अनुभवला. यमगरवाडी येथे सुरू केलेल्या वसतिगृहातून पुढे ‘समरसता गुरुकुलम्’ या अभिनव शिक्षणप्रकल्पाची उभारणी त्यांनी केली.
“प्रथम वसन, मग पुनर्वसन”
भटक्या-विमुक्तांच्या पुनर्वसनाआधी त्यांच्या वास्तव जीवनात उतरून त्यांचे प्रश्न समजून घेणं हेच खरी समाजसेवा असल्याचे स्पष्ट करत, “प्रथम वसन करा, मग पुनर्वसन” हे तत्त्वज्ञान त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून जगून दाखवले.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद होते. यावेळी तळेगाव शहर संघचालक विक्रम दाभाडे, सामाजिक समरसता मंचाचे डॉ. सुनील भंडगे, वाचनालयाचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी, चिटणीस प्रीतम भेगडे, ग्रंथपाल विनया अत्रे, कार्यक्रम प्रमुख यतीन शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक दिनेश कुलकर्णी यांनी केले, पाहुण्यांचा परिचय हर्षल गुजर यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन अविनाश राऊत यांनी केले.
प्रेरणादायी विचारांची मेजवानी
कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक, अभ्यासक, कार्यकर्त्यांनी प्रभुणे यांच्या अनुभवातून नवसंवेदनशील सामाजिक कार्याची दिशा घेतली. “बैठका कमी आणि कृती जास्त” या भूमिकेने काम करणारे प्रभुणे हे नव्या पिढीसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान ठरले.