किल्ल्यांचे गाव अंबवडे : दिवाळीत उजळते शिवरायांच्या इतिहासाची ज्योत
दिवाळीत अंबवड्यात साकारतात शिवकालीन किल्ल्यांची भव्य शृंखला
पुणे/सातारा । विजयकुमार हरिश्चंद्रे
सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेले अंबवडे गाव यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इतिहासाचा जिवंत आविष्कार घडवत आहे. पुण्यापासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेले हे छोटेसे गाव आता ‘किल्ल्यांचे गाव’ म्हणून राज्यभरात प्रसिद्ध झाले आहे.
दिवाळीचा सण सुरू होताच गावातील प्रत्येक घर, अंगण, चौक आणि शेतामध्ये मातीचे किल्ले उभारण्याची परंपरा जोमात सुरू होते. यंदाच्या वर्षी गावात तब्बल ५० हून अधिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. रायगड, प्रतापगड, राजगड, विशालगड, तोरणा, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, राजमाची, लिंगाणा यांसह अनेक दुर्मिळ व दुर्लक्षित किल्ल्यांच्या कलाकृती येथे पाहायला मिळतात.

या उपक्रमात गावातील लहान मुले, तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक सर्वजण उत्साहाने सहभागी होतात. शेतातील माती, शेणखत आणि पारंपरिक साहित्य वापरून तयार होणाऱ्या या प्रतिकृती केवळ कलात्मक निर्मिती नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि मावळ्यांच्या शौर्याचा जिवंत साक्षात्कार घडवतात.

हेही वाचा : वसमत आणि कळमनुरी तालुक्यांना भूकंपाचे सलग तीन धक्के; नागरिक भयभीत
प्रत्येक किल्ल्याची रचना बुरुज, तटबंदी, जलरचना आणि गडावरील जीवनशैली यांचे अचूक दर्शन घडवते. किल्ल्यांच्या परिसरात उभ्या केलेल्या मूर्ती, तोफा आणि रणदृश्य पाहताना जणू शिवराय आणि मावळ्यांची लढाई डोळ्यासमोर उभी राहते. दिवाळीच्या या सणानिमित्त गावात स्वरक्षणाचे प्रशिक्षण, लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा अशा पारंपरिक खेळांचे प्रात्यक्षिक, तसेच इतिहास आणि तंत्रज्ञानावर शैक्षणिक कार्यशाळा आयोजित केल्या जातात. लहान मुलांना इतिहासाची गोडी लावण्यासाठी आणि शिवकालीन व्यवस्थापन, शौर्य व तंत्रज्ञानाचे ज्ञान देण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू असतात.

या उपक्रमाबाबत बोलताना गावातील रामचंद्र जाधव आणि सचिन जाधव म्हणाले, “आधुनिक डिजिटल युगात मुलांनी केवळ मोबाईलवर नाही, तर मातीतून इतिहास शिकावा, हेच आमचे उद्दिष्ट आहे.” सातारा जिल्ह्यात फुलपाखरांचे, पुस्तकांचे आणि खेळांचे गाव म्हणून ओळख असताना आता आणखी एक मानाचा तुरा मिळाला आहे —
‘किल्ल्यांचे गाव अंबवडे’.या गावातील प्रत्येक किल्ला सांगतो —“मातीच्या प्रत्येक कणात शिवरायांचा इतिहास जिवंत आहे!”




