वसमत आणि कळमनुरी तालुक्यांना भूकंपाचे सलग तीन धक्के; नागरिक भयभीत

मुंबई : महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यांना रविवारी (दि. २६) दुपारच्या सुमारास भूकंपाचे सलग तीन धक्के बसले. दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांनी सिंदगी, गिरगांव, टोकाई, कोठारी, आखाडा बाळापूर, वारंगा, बोल्डा, जांब, पांघरा शिंदे आणि येहळेगाव गवळी या गावांमध्ये हे धक्के जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ३.९ एवढी नोंदवली गेली असून, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील सिंदगी परिसरात, सुमारे ५ किलोमीटर खोलीवर होता.
अचानक झालेल्या या कंपनांमुळे नागरिक घराबाहेर धावत बाहेर पडले आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांच्या मते, पहिला धक्का काही सेकंद जाणवला, त्यानंतर लगेच दोन सौम्य धक्के बसले. काही घरांच्या भिंतींना किरकोळ तडे गेल्याची नोंद झाली आहे, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हेही वाचा – राज्यात पावसाचा पुन्हा मुक्काम; पिकांचे नुकसान, पुढील दोन ते तीन दिवस वादळी पावसाची शक्यता
कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा, दांडेगाव, वारंगा फाटा, बाळापूर दिग्रस, जवळा पांचाळ या भागातही दुपारी ३.३७ वाजता सौम्य धक्का जाणवला. या भागात मागील वर्षी (ऑक्टोबर २०२४) देखील अशाच प्रकारचे दोन भूकंप झाले होते. शनिवारी देखील दुपारच्या सुमारास गुड आवाजासह सौम्य धक्का जाणवल्याने स्थानिक नागरिक चिंतेत आहेत.
मागील काही महिन्यांपासून रामेश्वर तांडा परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू मानला जात होता, मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्रबिंदू हदगाव तालुक्यातील सावरगाव भागात सरकला होता, तेव्हा ३.८ तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला होता.





