आजपासून सेवकांची सद्दी, २९ महापालिकांसाठी राज्यात सरासरी ६० टक्के मतदान

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी गुरुवारी सरासरी ६० टक्के मतदान झाले. शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये प्रशासकीय राजवट संपून सेवकांची सद्दी सुरू होणार आहे. मतदानावेळी याद्यांतील घोळांमुळे अनेकांना पायपीट करावी लागली. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व वनमंत्री गणेश नाईक यांचाही समावेश होता. धुळ्यात मतदान यंत्राची मोडतोड केल्याचा प्रकार घडला तर शाई लगेच पुसली जात असल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केल्याने वाद निर्माण झाला.
सुमारे नऊ वर्षांनंतर होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे अनेक ठिकाणी मतदानात उत्साह होता. मात्र विधानसभेला मतदान केलेल्या केंद्रांवर नावे नसल्याने मतदारांमध्ये गोंधळ उडाला होता. विधानसभेची मतदार यादीच वापरण्यात आली असली तरी महानगरपालिकांनी प्रभागनिहाय याद्या फोडताना नावांचा गोंधळ उडाल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. या गोंधळामुळेच मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांची मतदान केंद्र शोधताना दमछाक झाली. अनेक ठिकाणी मतदार याद्यांची प्रभागनिहाय विभागणी करताना एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या.
मतदानानंतर बोटावरील मार्कर पेनची शाई पुसली जात असल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या असून यावरून राजकीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोग सरकारला मदत करीत असल्याचा आरोप केला आहे. बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या माध्यमातील तक्रारींची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा – मतदान करताना ईव्हीएमचा फोटो व्हायरल केल्याप्रकरणी माजी नगरसेवकावर गुन्हा
प्रभागनिहाय मतदार याद्यांची विभागणी महापालिका स्तरावर होत असल्याने मतदार याद्यांमधील घोळास महापालिका जबाबदार असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर २०११ मध्ये आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी; तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजूला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वीदेखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्याचेही त्यांनी सांगितले.
मतमोजणीस शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरुवात होणार असून, सायंकाळी सहापर्यंत सर्व पालिकांमधील निकाल जाहीर होतील, अशी शक्यता वर्तविली जाते. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये मुंबईसह बहुतांशी महानगरपालिकांमध्ये भाजप व महायुतीला सत्ता मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पण निकाल काही तासाने लागणार असल्याने हे निष्कर्ष किती खरे ठरतात हे स्पष्ट होईल.




