मतदान करताना ईव्हीएमचा फोटो व्हायरल केल्याप्रकरणी माजी नगरसेवकावर गुन्हा

पिंपरी चिंचवड : मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीनवर मतदान करताना फोटो काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केल्या प्रकरणी भाजप उमेदवार अपर्णा डोके यांचे पती निलेश चंद्रकांत डोके यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
केंद्र कल्याण प्रमिष्ठा निर्मित सुखी भवन क्रमांक ५५ येथील खोली क्रमांक एक येथे निलेश डोके यांचे मतदान होते. गुरुवारी (१५ जानेवारी) सकाळी साडेसात वाजता ते मतदान करण्यासाठी गेले. मतदान केंद्रावर मोबाईल फोन नेण्यास मनाई असताना देखील त्यांनी मोबाईल फोन स्वतःकडे बाळगला. तसेच ईव्हीएम मशीनचा फोटो काढणे आणि तो प्रसारित करण्यास मनाई आहे. असे असताना देखील निलेश डोके यांनी ते मतदान करतानाचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यांनी मतदान गोपनीयतेचा भंग केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २२३, महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत, औद्योगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम २२/४ व २२/५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – GDG on Campus MIT ACSC तर्फे ‘AI & ML Simplified’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
निलेश डोके हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराचे पहिले शहराध्यक्ष तसेच पीसीएमटीचे माजी सदस्य आहेत. त्यांच्या पत्नी अपर्णा डोके या माजी महापौर आहेत. त्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सोडून भाजप मध्ये प्रवेश करत प्रभाग क्रमांक १८ मधून मनपाची निवडणूक लढवत आहेत.




