वेताळ टेकडी फोडण्याचा प्रकल्प म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर; बचाव समितीचा आरोप
![The project to break the Vetal hill is the allegation of the defense committee against Vada's oil vanga](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Vetal-Tekdi-Pune-780x470.jpg)
पुणे : वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी वेताळ टेकडी तोडायची गरज नाही तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे आवश्यक आहे. भविष्यात याच्याच बरोबर पाणीटंचाईपासून वाचायचे असल्यास पुणेकर नागरिकांनीच आवाज उठवणे ही काळाची गरज आहे. असे वेताळ टेकडी बचाव कृती समिती आणि लोकायत आयोजित वेताळ टेकडी वाचवा, पुणे वाचवा चर्चासत्रातील सूर आहे.
समितीच्या समन्वयक डॉ. सुषमा दाते म्हणाल्या की, टेकडी फोडण्याची जी कारणे दिली जात आहेत त्याचा जर नीट अभ्यास केला तर लक्षात येते की ज्यासाठी टेकडी फोडायची आहे त्यामुळे वाहनांचा फेरा विशेष कमी होणार नाही. मात्र पर्यावरणाची हानी जसं की १८०० झाडं तोडण्यात येतील असं म्हटलं जात असताना प्रत्यक्षात २००० पेक्षा जास्त झाडं प्रकल्पांतर्गत येतील, त्यावरील पशुपक्ष्यांचे जीवन नष्ट होईल.
बाणेर-पाषाण-कोथरूड, भांबुर्डा-शिवाजीनगर-गोखलेनगर-जनवाडी, एरंडवणे या सर्व परिसरांच्या भूमिगत पाणी स्त्रोत्रांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन, पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. या टेकडीवर नैसर्गिक पाण्याच्या खाणी आहेत त्या नष्ट तर होतीलच. शिवाय वर्षानुवर्षेचे त्यात अगदी तळातला भूमिगत पाणी साठा तयार व्हायला शेकडो वर्षे लागली असतील तो सर्व साठा नष्ट होईल. यासाठी त्यांनी चांदणी चौकातील रस्ता रुंदीकरणासाठी बाजूच्या टेकड्या फोडल्यामुळे जणू काही पाण्याचा नळ सोडला असं वाटेल इतके लाखो लिटर पाणी गळून जात आहे. टेकडी जणू काही पंक्चर झाली आहे. तेच वेताळ टेकडीबाबत होईल, असं प्रदीप घुमरे म्हणाले.
यावेळी खासदार वंदना चव्हाण, ज्येष्ठ लेखक मिलिंद बोकील, कॉंग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट, नदी सुधार समितीचे कार्यकर्ते सारंग यादवाडकर आणि पुणेकर नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.