आई आणि मुलाने एकाच साडीने घेतला गळफास; घटनेनं सोलापुरात हळहळ
![The mother and child wore the same sari; The incident caused a stir in Solapur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/The-mother-and-child-wore-the-same-sari-The-incident-caused-a-stir-in-Solapur.jpg)
सोलापूर | शहरातील शेळगी परिसरात आई आणि मुलाने एकाच साडीने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना उघड झाली आहे. उमादेवी सिद्धेश्वर पुराणिक (वय ६२ वर्ष) आणि दिग्विजय सिद्धेश्वर पुराणिक (वय ४२ वर्ष, रा. शिवगंगा नगर, शेळगी) अशी मृत मायलेकाची नावे आहेत. या दोघांनीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. मुलगा आणि आईने एकाच वेळी जीवन संपवल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
शेळगी येथील राहत्या घरी अज्ञात कारणावरून या दोघांनी ३० मे रोजी एकाच साडीने गळफास घेतला. सकाळपासून घरात सामसूम दिसत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी आत डोकावून पाहिले असता दोघे गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले. याबाबत जोडभावी पेठ पोलिसांना ताबडतोब माहिती देण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांना मृत घोषित केले. शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत याबाबत नोंद झाली आहे.