Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘मलाईदार खात्यांसाठी महायुतीत प्रयत्न सुरू’; काँग्रेस नेत्याची सरकारवर टीका

मुंबई | विधानसभेच्या निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आता १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच परभणीत घडलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या अवमानाच्या घटनेवरूनही त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

नाना पटोले म्हणाले, की परभणीतील घटनेचा आम्ही निषेध करतो. संविधान प्रतिकृती विटंबनेच्या घटनेप्रकरणी आम्ही सरकारकडे कारवाईची मागणी केली. मात्र, आज राज्यात तीन जणांचे जे सरकार आहे, सरकारमध्ये मलाईच्या खात्यासाठी भांडणं सुरु आहेत. मलाईचे खाते कोणाला मिळतात? फक्त यासाठी सरकार काम करत आहे. मग या सरकारने प्रशासनाला जे काही आदेश दिले त्या आदेशाच्या जोरावर परभणीत लाठीचार्ज झाला. मग परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले होते? त्यामुळे यावर देखील कारवाई झाली पाहिजे.

हेही वाचा     –        मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडा बांधणार २३९८ परवडणारी घरे, कधी निघणार लॉटरी?

दिल्लीतील मोदी सरकार ज्या प्रमाणे शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न करतं. त्याप्रमाणे आता महाराष्ट्रात देखील घडतंय का? तसा संदेश देण्याचा प्रयत्न आहे का? पण आम्ही महाराष्ट्रात हे कदापि चालू देणार नाही. काँग्रेस महाराष्ट्रात हिटलरशाही चालू देणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.

विधानसभा निवडणुकीचा निकाल ज्या प्रकारे आलेला आहे. त्या निकालाच्या धक्यातून लोक देखील बाहेर आलेले नाहीत. निकालाबाबत आजही अनेक ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये लोक ठराव घेताना दिसत आहेत. तसेच बॅलेटपेपरची मागणी करत आहेत. आम्ही दिलेलं मतदान नेमकं कोणाला गेलं हे शोधण्याचं काम लोक करत आहेत, असंही नाना पटोले म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button