किल्ले रायगडावर अवतरला शिवकाळ; शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

महाड : 6 जून 1674 ते 6 जून 2025 म्हणजे तब्बल 351 वर्षांचा कालावधी. याच दिवशी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. याच दिवशी किल्ले रायगडाने शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा अनुभवला होता. याची प्रचिती आजही येते.
शुक्रवारी पुन्हा एकदा जय शिवराय, जय शिवाजी जय भवानी अशा घोषणांनी दुर्गराज रायगड दुमदुमून गेला. राज्यातील तसेच देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवप्रेमींना पुन्हा शिवराज्याभिषेक सोहळा याचि देही याचि डोळा पाहण्याची अपूर्व संधी मिळाली.
शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर शुक्रवारी अत्यंत उत्साहात साजरा झाला. पावसाळ्यातील आल्हाददायी वातावरण, अशातच ढोल-ताशांचा गजर आणि शिवकालीन वेशभूषेत आलेले शिवभक्त यामुळे रायगडावर जणू शिवकाळ अवतरला होता.
हेही वाचा – “देशाच्या सुरक्षेसाठी समाजानेही सज्ज रहावे”; डॉ. मोहन भागवत
दोन दिवसांपासून किल्ले रायगडावर पारंपरिक मर्दानी खेळ, पोवाडे, जागरण, गोंधळ आणि ढोल ताशे नगारे यांच्या गजर सुरू होता. श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती अनेक वर्षांपासून रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करत आहे. यंदाही समितीने अत्यंत नियोजनबद्ध असे दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले.
राज सदरेवर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर लाखो शिवभक्तांनी शिवरायांच्या नामाचा एकच जल्लोष केला. शिवराज्याभिषेक गीताने या सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी संभाजीराजे छत्रपती आणि त्यांचे पुत्र शहाजीराजे यांनी विधिवत पूजा केली. तसेच महाराष्ट्रातील विविध नद्यांच्या जलाने शिवप्रतिमेवर जलाभिषेक करण्यात आला.
राज सदरेवरील उत्सव मूर्तीस अभिषेक करण्यात आला. येथील छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारुढ मूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला. यानंतर संभाजीराजे छत्रपती आणि रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय मानवंदना देण्यात आली. शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने किल्ल्यावर प्रचंड जल्लोषाचे वातावरण होते.