नांदेडमध्ये भीषण अपघात : ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ८ महिलांचा मृत्यू

Nanded Accident | नांदेडच्या आलेगाव शिवारात शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातामध्ये हळद काढणी करणारे ९ ते १० मजूर खोल विहिरीत पडले आहेत. या मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर संपूर्ण ट्रॉलीसह विहिरीत कोसळून हा अपघात घडला. या अपघातात अडकलेले सर्व मजूर हे हिंगोलीतील गुंज तालुक्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त मजूरांना वाचवण्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
ट्रॅक्टर कोसळला त्या विहिरीमध्ये पाण्यासह मोठ्या प्रमाणावर गाळही असल्यामुळे मजुरांना वाचवण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण होत आहे. ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानंतर पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे खालच्या गाळात तो रुतल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर गावातील गावकऱ्यांनी विहिरीभोवती मोठी गर्दी केली आहे. या ठिकाणी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.