खेड तालुक्यात भीषण अपघात : कुंडेश्वर दर्शनासाठी निघालेल्या पिकअप जीप दरीत कोसळली!
चालकाचे नियंत्रण सुटले: दुर्दैवी घटनेत ६ महिला मृत्युमुखी, २२ गंभीर जखमी
पुणे : श्रावण सोमवार निमित्ताने कुंडेश्वर येथे दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांच्या पिकअप जीपला खेड तालुक्यात मोठा अपघात झाला. पाईट – कोहिंडे सीमेवर नागमोडी वळण असलेल्या घाट रस्त्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप थेट खोल दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत ६ महिला जागीच मृत्युमुखी पडल्या असून २२ हून अधिक महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघात दुपारी एकच्या सुमारास घडल्याची माहिती असून, जखमींवर चांडोली येथील ग्रामीण रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. २५ ते ३० महिला भाविक पिकअपमध्ये प्रवास करत होत्या, त्यामुळे वाहनाचा तोल गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.
अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. रुग्णवाहिकांद्वारे जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
श्रावण सोमवारच्या भक्तीचा प्रवास, हृदयद्रावक दुर्घटनेत बदलला. प्रशासनाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनास्थळाचे महत्त्वाचे ठळक मुद्दे :
-
अपघाताचे ठिकाण : पाईट – कोहिंडे सीमेवरील नागमोडी घाट
-
अपघाताची वेळ : दुपारी १ वाजता
-
वाहन : महिला भाविकांची पिकअप जीप
-
कारण : चालकाचे नियंत्रण सुटणे
-
मृतांची संख्या : ६ महिला
-
जखमी : २२ पेक्षा अधिक, अनेकांची प्रकृती चिंताजनक
भाविकांच्या वाहतुकीसाठी सुरक्षित पर्यायांची कमतरता
श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर भाविक मंदिरांमध्ये दर्शनासाठी प्रवास करतात. अशा वेळी विशेषतः ग्रामीण व डोंगराळ भागांतून येणाऱ्या भक्तांसाठी सुरक्षित व सार्वजनिक वाहतूक पर्यायांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे भाविकांना खासगी जीप, पिकअपसारखी अपुरी व असुरक्षित वाहने वापरावी लागतात. भाविकांच्या जीविताला धोका पत्करूनच का दर्शनाचा प्रवास करावा लागतो आहे. प्रशासनाने अशा काळात अतिरिक्त एस.टी. बस सेवा किंवा सुरक्षित प्रवासासाठी स्थानिक पातळीवर मार्गदर्शक नियम लागू करणे आवश्यक आहे.





