नांदेडच्या १४ वर्षीय कन्येचे अमेरिकेत यशस्वी विमानउड्डाण
नांदेड – जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावच्या एका शेतकरी कुटुंबातील अवघ्या १४ वर्षीय कन्येने आपल्या अनोख्या कामगिरीतून अख्ख्या गावाची मान अभिमानाने उंचावली आहे. कोंढा या गावच्या जोगदंड कुटुंबातील १४ वर्षीय रेवा या कन्येने पायलटचे प्रशिक्षण घेत अमेरिकेत यशस्वीरीत्या विमान उडवले आहे. तिच्या या कामगिरीची माहिती मिळताच कोंढा गावात आनंदोत्सव साजरा होत आहे.
कोंढा येथील रहिवासी केशवराव बालाजी जोगदंड यांचे पुत्र दिलीप केशवराव जोगदंड हे २० वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थायिक झाले आहेत. तेथे त्यांनी (स्ट्रिंग कंट्रोल्ड)दोरीवर विमान उडवून दाखविण्याविषयी संशोधन करून यशस्वी प्रयोग केला होता. यातूनच त्यांची मुलगी रेवा जोगदंड हिलाही प्रेरणा मिळाली. तेव्हापासून तिने भविष्यात पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढील वाटचाल सुरू केली आणि हे स्वप्न सत्यातही उतरविले. रेवा जोगदंड हिने २० जून रोजी चक्क विमान उडवून आकाशात यशस्वी झेप घेतली आहे. तिच्या या यशाची बातमी कोंढा येथे कळताच तिचे आजोबा केशवराव जोगदंड आणि संपूर्ण जोगदंड परिवारासह कोंढेकर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. आपल्या गावातील मुलीने अमेरिकेत जाऊन पायलट होण्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल ग्रामस्थांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.





