येड्याची नडली संगत, मसणात बसली पंगत !

आपल्याकडं एक प्रचलित म्हण आहे ‘असंंगाशी संग !’ एखाद्या चुकीच्या माणसाबरोबर जर आपली मैत्री झाली, तर त्यातून काहीही उद्भवू शकतं. मग ती मानहानी असो, मोठा अपमान असो..नाहीतर आर्थिक, मानसिक नुकसान असो..अशा असंगाशी संग केल्याचा फटका हमखास ठरलेला असतो ! खेडेगावात यालाच म्हणतात.. येड्याची नडली संगत..मसणात बसली पंगत !
किस्सा तंतोतंत लागू..अमरसिंग यांचा !
मूळ मुद्द्याला हात घालण्यापूर्वी याच अनुषंगानं थोडसं विषयांतर करतो. समाजवादी पक्षाचे एक दिवंगत नेते अमरसिंग यांचा किस्सा..समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यांचा उजवा हात असणारे, त्या पक्षाचे सरचिटणीसही असणारे आणि नंतर पक्ष सोडून दुसरीकडं जाणारे अमरसिंग आठवा.. त्यांचा उल्लेख समाजवादी पक्षाचे ‘चाणक्य’ असा केला जायचा बरं का!
..तर हे अमरसिंग नंतर अमिताभ बच्चन, अनिल अंबानी यांचे जिगरी दोस्तही झाले. नंतर हळूच ते ‘भाजपाई’ बनले..पण, तिथे त्यांच्या बुद्धिमत्तेची डाळ शिजेना, कारण व्यवस्थित काड्या घालणे हा अमरसिंग यांचा मुख्य धंदा आणि राजकारण हा जोड धंदा!
नंतर ते हळूच पुन्हा समाजवादी पक्षाच्या तंबूत शिरले. तोपर्यंत समाजवादी पक्षात उलथापालथ झाली होती आणि मुलायम सिंग यांना बाजूला करून अखिलेश यादव हे प्रमुख झाले होते. तिथं अखिलेश विरुद्ध त्यांचे काका शिवपाल यादव असा संघर्ष सुरू होता.
हेही वाचा : ‘न्यू इंडिया बँकेतील घोटाळ्यात सर्व भाजपचे लोक’; संजय राऊतांचा गंभीर आरोप
प्रश्न अखिलेश बद्दल, उत्तर जया बच्चन बद्दल..
एके दिवशी अमरसिंग यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यात एका पत्रकारानं विचारलं, की अखिलेश आणि रामपाल यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे.. त्याला कारणीभूत अमरसिंग आहेत का ? या प्रश्नाला उत्तर द्यायचं त्यांनी टाळलं, आणि मूळ प्रश्नाला बगल देत उत्तर देऊन टाकलं, की अमिताभ आणि जया बच्चन हे गेली 22 वर्षे एकत्र राहत नाहीत, ते काय माझ्यामुळं ? थोडक्यात, अशा माणसाबरोबर मैत्री केल्याचा फटका अमिताभला बसला नसेल तरंच नवल !
आता संजय राऊत आणि शरद पवार !
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हा किस्सा थोडक्यात सांगितला. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या अनेकदा भेटीगाठी होताना दिसतात. इथंपर्यंत ठीक आहे..पण, संजय राऊत नावाच्या नेत्याची संगत किती वाईट हे शरद पवारांना आता कळून चुकलं असेल. उबाठा गटाचे कट्टर शत्रू म्हणजे एकनाथ शिंदे..या एकनाथ शिंदे यांचा मोठा सत्कार आणि पुरस्कार वितरण शरद पवार यांच्या हस्ते झालं. टाळके फिरले नसेल तर ते संजय राऊत कसले ? झालं..त्यांनी शरद पवारांवरच तोफ डागली..यालाच म्हणतात, असंंगाशी संग.. हे स्वतः गाळात जाणार आणि बरोबर जी जी मंडळी आहेत, त्यांनाही घेऊन जाणार..पटतंय ना !
शिंदेंबाबत पवारांचे गौरवोद्गार खटकले
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला आणि त्यांचं कौतुक करणारे चार चांगले शब्दही वापरले. गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांमध्ये फूट पडली आणि दोघांवर पराभवाची नामुष्की आली तरी पवार यांनी आकांडतांडव केला आहे, असे चित्र दिसलं नाही. या उलट संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे बेभान झाल्यासारखं बोलत आहेत आणि आणखी किती काळ बोलणार आहेत, हे माहीत नाही. हे दोन्ही गट प्रतिस्पर्ध्यावर टीका करतात, हे मान्य करू. पण, आता संजय राऊत यांनीच शरद पवारांना वेठीस धरणं ही बाब जरा आश्चर्यचकित करणारी आहे.
संजय राऊत यांचे वाभाडे
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला, त्याचे पडसाद सगळीकडं उमटले, संजय राऊत यांनी तर शरद पवार यांच्यावरच तोंडसुखच घेतले. तथापि, शरद पवार यांच्या मनात नसताना देखील संजय राऊत यांचे परस्पर वाभाडे निघाले आहेत. आपल्या राज्यातील वाचाळ, तोंडाळ राजकारणी आणि बोलभांड प्रवक्ते सध्या बरेच शांत आहेत. पण, त्याला अपवाद संजय राऊत ठरले आहेत. त्यांची अवस्था पंक्चर झालेल्या गाडी सारखी आहे. काहीतरी दाखवायचं म्हणून किंवा काहीतरी छापायला हवं म्हणून संजय राऊत यांच्या बोलण्याला प्रसिद्धी मिळते, हे नाकारून चालणार नाही.
सगळा आटापिटा ठाकरेंना खुश करण्यासाठी
आपल्या पक्षप्रमुखाला खूश करण्यासाठी स्वाभिमान किती गुंडाळून ठेवायचा, याला देखील मर्यादा असतात, हे संजय राऊत यांना समजायला हवं. उबाठा गट म्हणजे महाराष्ट्र समजणाऱ्या या बोलघेवड्या नेत्याला महाराष्ट्राचा अभिमान वगैरे भाषा म्हणण्याचा अधिकार आहे का ? बरं, तुझ्या पक्षाचं तू वाटोळं कर ना.. इतरांना ते हवंच आहे! मुद्दा शरद पवार यांच्या संदर्भातला आहे. त्यांच्या धोरणांवर टीका केली तरी त्यांचे ज्येष्ठत्व वादातीत आहे. ते भावनेत वाहणारं व्यक्तिमत्त्व नक्कीच नाही. अजूनही पहाटेपासून कार्यरत राहण्याची त्यांना संवय आहे आणि एखाद्या वाक्यानं किंवा हालचालीनं राजकीय संदेश धाडण्याचं त्यांचं कसब आहे, हे डबक्यात राजकारण खेळणाऱ्या संजय राऊत यांच्या मेंदूत शिरण्यापलीकडंच आहे.
शिंदे यांचा सत्कार केला म्हणून कोणी आक्षेप घेईल, असं त्यांना माहित नसावं, असं म्हणता येत नाही, पण एक संदेश असा मिळाला, की 2019 मध्ये पवार यांनी जी काही स्ट्रॅटेजी आखली होती, ती ‘वनटाईम’ होती. तो ठाकरे किंवा संजय राऊत यांच्याशी केलेला दीर्घकालीन करार नव्हता. पवार हे अशा प्रकारचे राजकीय फलंदाज आहेत की ते गोलंदाज धावायला लागला की बॅट कशी फिरवायची ते ठरवत नाहीत, तर चेंडूचा टप्पा बघून बॅट घुमवतात. म्हणजे, मैदानात न खेळता देखील धावा काढण्याची कला त्यांना अवगत आहे, म्हणूनच कोणताही राजकीय पक्ष जिंकला तरी शरद पवार हे ‘मॅन ऑफ द मॅच’ आहेत, असं मानलं जातं, पण, हे संजय राऊत यांच्या डोक्यात घुसण्यापलीकडचं आहे.
पवारांपुढं संजय राऊत किरकोळ
शरद पवार यांच्या तुलनेत संजय राऊत हे फार किरकोळ राजकीय खेळाडू आहेत. पवार यांनी गरज होती, तेव्हा त्यांचा व्यवस्थित उपयोग करुन घेतला.. ते त्यांचे राजकीय कौशल्य म्हणू या. पवार यांनी काय करावे आणि कोणाचा सत्कार करावा किंवा करु नये, हे संजय राऊत यांनी सांगावं आणि ते पवार यांनी ऐकावं, असं कधी घडेल का हो? अशी सुतराम शक्यता नाही. पवार यांच्याबरोबर पंगतीत बसण्याची संधी संजय राऊत यांना मिळाली खरी, पण ती पंगत पवार यांच्यासाठी होती, संजय राऊत यांच्यासाठी नव्हे!
बाळासाहेब बनण्याचा प्रयत्न
वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री होती, तरीही दोघे एकमेकांचे राजकीय विरोधक होते. पवार यांच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांनी काही उद्गार काढले, तर ते खपून जायचे, पण असा अधिकार संजय राऊत यांनी स्वतःकडं घेणं मुळीच योग्य नाही. आता स्पष्ट सांगायचं तर पवार यांना उबाठा गटाची फारशी गरज उरलेली नाही. पवार यांना प्रवाहाच्या विरोधात कसं पोहायचं, हे संजय राऊत यांनी शिकवावं अशी वेळ नक्कीच आलेली नाही. पुन्हा एक खेड्यातली म्हण वापरावी लागते.. कुठं तो इंद्राचा ऐरावत आणि कुठं ती श्याम भटाची तट्टाणी !