आरोपी निलेश चव्हाण विरोधात ‘स्टँण्डींग वॉरंट’
मालमत्ता जप्त होणार; न्यायालयाने केला आदेश जारी

पिंपरी-चिंचवड | वैष्णवी हगवणे मृत्यु प्रकरणातील पसार असलेला सहआरोपी नीलेश चव्हाण याच्याविरोधात ‘लूक आऊट’ नोटीस काढल्यानंतर पोलिसांनी आता त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी पोलीसांनी न्यायालयात ‘स्टँण्डींग वॉरंट’साठी परवानगी मिळण्याकरिता न्यायालयात अर्ज केला असता गुरूवारी (दि. २९) न्यायालयाने स्टॅण्डींग वॉरंट जारी केले. पसार आरोपी चव्हाण पोलीसात हजर न झाल्यास त्याला फरार घोषीत करून पोलीसांकडून न्यायालयाच्या परवानगीने त्याच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल.
वैष्णवी हगवणे मृत्यु प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात २४ मे रोजी कलम वाढ करून नीलेश चव्हाण यालाही सहआरोपी केले आहे. वैष्णवी यांच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दहा महिन्यांचे बाळ चव्हाण याच्याकडे असताना कस्पटे कुटुंबीय त्याच्याकडे बाळ आणण्यासाठी गेले असता त्यांना नीलेश याने पिस्तूलचा धाक दाखवून धमकाविले होते. त्या प्रकरणातही वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल आहे. हे गुन्हे दाखल झाल्यापासून चव्हाण पसार आहे. तो पोलिसांना गुंगारा देत आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची पाच पथके तर, पुणे पोलीसांची तीन पथके त्याच्या मागावर आहेत. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरु केला आहे.
हेही वाचा : जनसंख्याशास्त्र, लोकशाही आणि विविधता’ हा नवभारताचा आत्मा; उपराष्ट्रपती जगदीप धनखड
पुणे, मुंबई, कोकणासह कर्नाटक, गोव्यातही तपास केला जात आहे. त्याच्या संपर्कातील मित्र, नातेवाईक यांच्याकडेही कसून चौकशी केली जात आहे. परंतु, तो अद्याप पोलिसांना सापडला नाही. याबाबत परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले, नीलेश चव्हाण पसार आहे. त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी परवानगी मिळण्याकरिता न्यायालयाकडे स्टॅण्डींग वॉरंटची परवानगी मिळण्याकरिता बुधवारी (दि. २८) न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने गुरूवारी (दि. २९) याबाबत ‘स्टँण्डींग वॉरंट’ जारी केले.
स्टँडिंग वॉरंट म्हणजे काय?
जेव्हा एखादा आरोपी जाणीवपूर्वक आपली ओळख लपवून पसार राहतो. त्याला न्यायालयात हजर करणे कठीण होते. तेव्हा न्यायालय स्टँण्डींग वॉरंट जारी करते. हे वॉरंट मिळाल्यानंतर पोलिस आरोपीच्या घराचे व मालमत्तेचे ठिकाण शोधून तेथे जाहीर उद्घोषणा करतात. जर, आरोपी हजर झाला नाही तर पोलीसांकडून त्याला फरार घोषीत करून न्यायालयात अहवाल सादर केला जातो. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार, त्याच्या स्थावर (जमिनी, घरे) आणि जंगम (वाहनं, मौल्यवान वस्तू) मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाते.