ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

पावसाचा सर्जिकल स्ट्राईक, शेतकऱ्याच्या नशिबी फाईट!

‘मान्सून..कमिंग सून’ असे दरवर्षी हवामान खाते ओरडून ओरडून सांगत असते..अंदमानमध्ये आला..केरळच्या किनारपट्टीवर धडकला.. गोव्यात आला.. महाराष्ट्रात पोहोचला..असे दरवर्षी वातावरण असते..पण, यंदा अंदमानमध्ये आला आला, म्हणत त्याने महाराष्ट्रही व्यापून टाकला! ‘सर्जिकल स्ट्राईक’ म्हणजे काय हेच दाखवून दिले!

पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा !

खरोखर, यावर्षी अवकाळी पाऊस सुरु झाला, असे म्हणता म्हणता चक्क मान्सूनचा पाऊस येऊन थडकला. चक्क, बारा दिवस अगोदर पाऊस देशात पोहोचला आहे. तसेच मान्सूनपूर्व पाऊस ही दमदार झाला आहे. मुंबईचा विचार करायचा झाला, तर नावे सफाईसाठी आणि मिठी नदीचा गाळ काढण्यासाठी खर्च केलेला पैसा खोटा ठरला आहे, एवढा पाऊस मोठा आला आहे!

बळीराजा सुखावण्याऐवजी चिंतेत..

खरे तर, या पावसानंतर पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु होते. मे महिन्यात शेते तयार केली जातात. वळवाच्या पावसानंतर जमिनीला वाफसा येतो. मग होणारी पेरणी आणि जून, जुलैमध्ये होणारा पाऊस हा सगळा कर्म यावर्षी चुकलेला दिसतो आहे. पावसाचे आगमन सात जुलै ऐवजी साधारण एक पंधरवडा आधीच झाल्याने शेतीचे जे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. आता नुकसान भरपाई कधी मिळेल ? सांगता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांना द्यायला सरकारजवळ किती पैसे आहेत आणि ते कुठून देणार? हा प्रन विचारणे, हे हल्ली खुले गुपित ठरू पाहत आहे. मात्र, काही प्रमाणात तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे अशी स्थिती नक्कीच आहे.

तापलेल्या उन्हाळ्याचा अनुभव !

यंदा विदर्भात अकोला, चंद्रपूरमध्ये पारा ४३ ते ४५ अंशापर्यंत गेला. त्यानंतरचे दोन महिने जादा तापमानाचे असतील, असा अंदाज होता. परंतु एप्रिलची सुरुवात अवकाळी पावसाने झाली. फक्त विदर्भच नाही, तर मुंबई, कोकणातही एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव सध्या महाराष्ट्राला येत आहे. राज्यात या वर्षी तरी अवकाळी पाऊस होणार नाही, असे वाटत होते; परंतु, गेल्या दीड महिन्यांपासून राज्यात नियमित मान्सूनसारखा पाऊस पडतो आहे. अवकाळी पाऊस का पडतो, यामागे विज्ञान आहे, त्याचे विश्लेषण हवामानातज्ज्ञ सांगतात.

हेही वाचा –  राज्यात लवकरच ‘एक राज्य, एक नोंदणी’ मोहीम : बावनकुळे

मान्सूनचा पॅटर्न बदलला..

ज्या विदर्भात पारा ४५ अंशावर पोहोचला होता, तिथेच सर्वाधिक पाऊस कोसळला, मान्सूनच्या पॅटर्नमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. शेतजमिनीमध्ये रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे बाष्पीभवनाच्या स्तरांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन वातावरणामध्ये भोवरे तयार होतात आणि त्या भोवऱ्यामध्ये बाष्प अडकते. वेगवेगळ्या ठिकाणचे कमी जास्त तापमान आणि वायुदाब यामुळे वारे वाहू लागतात. बाष्पीभवन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यामुळे पाणी धारण करणारा ढग तयार होऊन पाऊस पडतो.

मराठवाडा तर ढगफुटीचा प्रदेश..

महाराष्ट्रात आपण साधारणतः दि. ७ जून ते ३० सप्टेंबर असे चार महिने पावसाळा घरायचो, ते निसर्गचक्र कायम असायचे. पण, मान्सून पॅटर्न बदलामुळे चक्रीवादळ, गारपीट, ढगफुटी यांच्याही अनियमित बदलामुळे मराठवाडा हा ढगफुटीचा प्रदेश बनला की काय? अशी शंका येते. अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यात वित्तहानीसोबतच जीवितहानीदेखील झाली. माणसे, जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला, बुलढाणा जिल्ह्यात चार हजार हेक्टरवरील रब्बी पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले. अमरावतीमध्ये सर्वाधिक नुकसान आतापर्यंतचे झाले आहे. उन्हाळ्यात बाजारपेठांमध्ये धान्य आणि इतरही पदार्थ बाहेरच असतात, त्यांचीही नासाडी अवकाळी पावसामुळे झाली. कोकणात एप्रिलच्या सुरुवातीलाच सलग दोन दिवस पाऊस पडत होता. यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजूचे मोठे नुकसान झाले. कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले.

हातातोंडाशी आलेला घास..

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. येथेही अवकाळी पावसाने चुमाकूळ घातला. अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला. एप्रिलच्या सुरुवातीला सुरू झालेला अवकाळीचा फटका राज्यात दर दोन-तीन दिवसांनी कुठल्या ना कुठल्या भागाला आता मेच्या अखेरीसही बसत आहे. मुंबईपासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आणि विदर्भ, मराठवाड्यापासून नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळीच्या कोसळधारा कोसळत आहेत. ऐन उन्हाळ्यात ऐतिहासिक वेरुळ लेण्यावरील धबधबा प्रवाहित झाला आहे. उन्हाळ्यात निर्माण झालेल्या आल्हाददायक वातावरणामुळे शहरी मध्यमवर्गीय सुखावला असला तरी महिन्याभराच्या या अवकाळीमुळे २१ जिल्ह्यांतील ८६ तालुक्यांमध्ये अतोनात नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्तांना दिलासा द्या..

पावसाने झोडपल्यानंतर राज्य सरकारने अवकाळीग्रस्तांचे, पीडितांचे म्हणणे ऐकून घेण्याची गरज आहे. मदत आणि पुनर्वसन खाते राज्य सरकारकडे आहे. स्वतंत्र कृषी विभाग आहे. त्यामुळे या संबंधित खात्यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याची नितांत आवश्यकता आहे. मान्सून किंवा मान्सूनपूर्व कालावधीव्यतिरिक्त पडणारा पाऊस महणजे अवकाळी पाऊस म्हणून ओळखला जातो. पण, यंदा पावसाळ्याइतका सर्वदूर आणि जास्त पाऊस झाल्याने हंगामात पावसाने दगा देऊ नये, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. या सगळ्यावर विचार करता बदलत्या हवामानास कृषीसाठी पर्याय पिकांचा शोध घेतला पाहिजे. हवामान बदल होऊ नये यासाठी पर्यावरण निदान आहे, ते तरी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन हवे!

पर्यावरणाचा आणि पावसाचा लहरीपणा दरवर्षी हल्ली फटका द्यायला लागला आहे. यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे एखादी खाते सरकारने सुरू करावे आणि अत्याधुनिक यंत्रणेद्वारे क्षणाक्षणाला गावागावात माहिती पुरवावी. पाऊस कधी येणार इथं पासून ते कोणते पीक घेणार, याचे मार्गदर्शन या आधुनिक काळात करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच पारंपारिक पिकांशिवाय बदलत्या हवामानास जे पीक बळी पडत नाही, त्या पिकांचा अवलंब शेतकऱ्यांनी केला पाहिजे. तरच शेतकऱ्याला दिलासा मिळेल. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे जे पावसाचे सर्जिकल स्ट्राइक होत आहेत, त्याला तोंड देण्यासाठी हाच एकमेव उपाय समोर दिसत आहे, हे नक्की !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button