संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून; अनेक मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा अर्थात उत्तरार्ध सोमवारपासून सुरू होत असून, या टप्प्यात विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव दाखल केला असून, त्यावर सभागृहात चर्चा होणार आहे.
याशिवाय पश्चिम आशियातील सुरू असलेले युद्ध, इराणबाबत केंद्र सरकारची भूमिका, रशियाकडून भारताची तेल खरेदी तसेच पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन हे मुद्देही विरोधकांकडून उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संसदेतील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
पश्चिम आशियातील संघर्ष हा या अधिवेशनातील प्रमुख मुद्दा ठरू शकतो. भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत अमेरिकेने दिलेल्या परवानगीवरून विरोधकांनी आधीपासूनच सरकारवर टीका केली आहे. या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न राहणार आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेत सुमारे ६० लाख मतदारांची नावे वगळली गेल्याचा मुद्दा तृणमूल काँग्रेस कडून उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष कडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अलीकडील पश्चिम बंगाल दौर्यात राजशिष्टाचाराचा भंग झाल्याचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो.
अधिवेशनादरम्यान सदस्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी भारतीय जनता पक्ष तसेच काँग्रेस पक्ष यांनी आपल्या खासदारांसाठी पक्षादेश जारी केला आहे. दरम्यान, पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीबाबत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर सोमवारी लोकसभेत निवेदन करणार आहेत. ९ मार्चच्या लोकसभेच्या सुधारित कामकाजाच्या यादीत त्यांच्या निवेदनाचा उल्लेख करण्यात आला आहे.





