सत्यप्रिय असणारी गुरूची प्रिय अशी ही रास
'धनू राशी'साठी कसं असेल नवीन वर्ष?
धनू रास : सत्यप्रिय असणारी गुरूची प्रिय अशी ही रास. ज्ञान मिळविण्यासाठी ही रास सातत्याने प्रयत्नशील असते, तसेच साहसी वृत्ती असल्यामुळे मुळातच काहीसा बेडरपणा असतो. धैर्य दाखवताना विवेकही सांभाळण्याची आवश्यकता आहे. मदतीसाठी तत्पर असणारे या राशीचे लोक बोलण्याने जिंकून घेतात. यंदा प्रगतीचे दालन खुले होणार आहे, बढतीचे योग प्रबळ आहेत. त्याबरोबरच कष्टही वाढणार आहेत. यंदा नातेसंबंध मधुर राहतील. संततीकडून समाधान लाभेल. तणावाचे प्रसंग येतील, मात्र त्यातून निभावून जाल. प्रकृतीच्या काहीशा तक्रारी जाणवतील; मात्र काळजी घेऊन पुढे जात राहा.
जानेवारी : आपली वाणी चांगली राहील. आई-वडिलांशी मधुर संबंध राहतील. सप्तम स्थानी मंगळ आहे. कौटुंबिक वाद टाळावेत, तर मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. व्यवसायामध्ये अडकलेली कामे पूर्ण होतील. आवक चांगली राहील. नोकरीत (Job) सामान्य स्थिती राहील, असे दिसते. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळलेले हितावह आहे. दूरच्या प्रवासाचे योग आहेत; पण प्रवासात आवश्यक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. महिन्याच्या अखेरीस देवधर्मात मन गुंतेल. संपत्ती खरेदी-विक्रीसाठी अनुकूल काळ आहे.
महिलांना घरातील भौतिक सुख सुविधांत वाढ होईल, असे दिसते. धावपळ होईल. मुलं आपल्या वर्तवणुकीतून आपल्याला समाधान देतील.
विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. विशेषतः उच्च शिक्षणासाठी चांगली संधी मिळू शकते, त्यामुळे प्रयत्न करावेत.
अनुकूल दिवस ः १, २, ३, ४, ८, ११, १९, २०, २१, २२, २८, २९, ३०, ३१
फेब्रुवारी : लहान प्रवासाचे योग आहेत. स्थावर संबंधित व्यवहार जपून करावेत. कार्य सफल होईल; पण मध्ये बरेच अडथळे येतील. महिन्याच्या सुरुवातीलाच एखादा मोठा आर्थिक लाभ होऊ शकेल. परिवाराशी संबंध चांगले राहतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. काम वाढेल, त्यामुळे कामामध्ये गुंतून पडाल. व्यवसायात मोठे निर्णय घेणे पुढे ढकललेले बरे. भागीदारीमधील आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करावेत. कोणत्याही वादविवादात पडू नये. खर्चावर नियंत्रण राखणे आवश्यक आहे.
महिलांनी घरातल्या वडीलधाऱ्यांची काळजी घ्यावी. प्रकृतीस जपावे. बोलताना संयम बाळगा. बोलण्याचा विपर्यास होणार नाही, याची काळजी घ्या.
विद्यार्थ्यांसाठी हा महिना अगदी सामान्य आहे. प्रयत्नपूर्वक अभ्यास करायला हवा. बलोपासना करावी.
अनुकूल दिवस
४, ७, १५, १७, १८, १९, २५, २६, २७, २८
मार्च : नोकरीमध्ये सौख्य लाभेल. आपल्या कामाची प्रशंसा होईल. काहींना बढतीचे योग आहेत. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागतील, असे दिसते. आरोग्यात सुधारण होईल. मनोबलही चांगले राहण्याचे योग आहेत. व्यवसायात आर्थिक प्राप्ती चांगली राहील. व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक करू शकता. मधुर वाणीमुळे समाजात मान सन्मान मिळेल. संपत्ती खरेदीचे योग आहेत. वाहने जपून चालवणे हितकारक आहे. स्त्रीधन प्राप्तीचे योग आहेत, असे दिसते. भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका.
महिलांसाठी चांगला काळ आहे. करिअरला चांगले वळण मिळेल. छंद जोपासण्यास, फिरायला जाण्यासाठी वेळ मिळू शकतो. त्यामुळे नवी ठिकाणे पाहण्याचा योग आहे.
विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. यशप्राप्तीचे योग आहेत. सुसंगतीत राहणे आवश्यक.
अनुकूल दिवस
३, ६, ७, १४, १५, १६, १८, २६, २७, ३०, ३१
एप्रिल : नोकर व हाताखालचे लोक चांगले सहकार्य करतील. सप्तमातील मंगळ स्त्री सुखात कमतरता दर्शवितो. आर्थिक स्थिती चांगली राहील. कौटुंबिक आरोग्य सांभाळावे लागेल. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. घरी एखाद्या नवीन वस्तूचे आगमन होऊ शकेल. खर्चाचे प्रमाण वाढले तरी आर्थिक प्राप्तीही चांगली राहील. नोकरीत – व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. आपल्या बोलण्यातून कोणी दुखावले जाणार नाही, अथवा गैरसमज निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. वाहन खरेदीचेही योग आहेत.
महिलांना कामात वाढ होण्याची शक्यता आहे. स्वतःसाठी वेळ काढणे कठीण असेल, असे दिसते. एखाद्या धार्मिक ठिकाणी यात्रेचे योग आहेत.
विद्यार्थ्यांसाठी सफलतेचे दिवस आहेत, पण निष्काळजीपणा न केलेला बरा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको.
अनुकूल दिवस
२, ३, १०, ११, १२, १४, २१, २२, २३, २७, ३०
मे : विवाहेच्छुकांचे विवाह जुळण्याचे योग दिसत आहेत. मेजवानी, पर्यटन, महागड्या वस्तूंची खरेदी यांवर पैसा खर्च होईल. काहींना पुत्रलाभाचे योग दिसतात. आरोग्याची निगा राखा. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कोर्टाच्या कामात पारडे आपल्या बाजूने राहू शकते. मुलाबाळांकडून सौख्य लाभेल. व्यवसायात काही प्रमाणात संघर्ष करावा लागू शकतो; पण लाभही उत्तम होईल. फार जोखीम न घेतलेली बरी. नोकरीमध्ये कामाच्या बाबतीत कुचराई करू नका. वरिष्ठांची नाराजी ओढावून घेणे चांगले नाही.
महिलांना कौटुंबिक जबाबदारीत वाढ होऊ शकेल. तब्येतीच्या तक्रारी. आरोग्याची काळजी घ्या. भावंडांशी मतभेद संभवतात.
विद्यार्थ्यांची एकाग्रता कमजोर होईल. व्यर्थ कालहरण टाळा. व्यायामात रुची निर्माण होईल.
अनुकूल दिवस
८, ९, १०, ११, १९, २०, २४, २५, २७, २८
जून : प्रवासाचे योग आहेत. उपवर मुलींचे विवाह जुळून येण्यास अनुकूल काळ आहे. प्रत्येक महत्त्वाच्या कार्यात गुप्तता बाळगावी. जमीन, इस्टेटच्या व्यवहारात लाभ होईल. कोर्टाची कामे सामंजस्याने, तडजोडीने सोडवावीत. नवीन नोकरी लागू शकेल. गुंतवणूक करताना फार मोठी रक्कम एकाचवेळी न गुंतवलेली बरी. समाजात प्रतिष्ठित व्यक्तींशी चांगली ओळख होईल. जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. व्यायाम, योग या गोष्टींवर भर देणे मानसिक व शारीरिक आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आहे.
महिलांना प्रिय व्यक्ती भेटण्याचे योग आहेत. बोलताना विचार करून बोलावे. नको त्या व्यक्तींना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये.
विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा यातसुद्धा यश मिळेल व कौतुक होईल.
अनुकूल दिवस ः ४, ५, ६, ७, १४, १५, १६, १७, २१, २४
जुलै : कुटुंबात शांतता राहील याची काळजी तुम्हीच घ्यायची आहे. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. अतिविचार व नकारात्मकता टाळा. मेंदू सतत व्यस्त ठेवा. व्यवसायात बेसिक काळजी घेतल्यास चांगला नफा होण्याचे योग दिसतात. स्थावर संबंधित व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. नोकरीत स्वतः कोणताही वाद ओढावून घेऊ नका. सहकाऱ्यांना चांगली वागणूक द्यावी. आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. आवश्यक विश्रांती घेणे गरजेचे आहे. शुभ कार्यात पैसा खर्च होईल. वाहन खरेदीचे योग दिसतात.
महिलांनी अतिउत्साहाच्या भरात कामाचा व्याप वाढवून घेऊ नये. नंतर पश्चाताप होईल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा.
विद्यार्थ्यांसाठी सामान्य शुभ काळ आहे. एखाद्या परीक्षेत चांगले यश मिळण्याचे योग आहेत.
अनुकूल दिवस
१, २, ३, ५, ११, १२, १३, १८, २१, २९, ३०, ३१
ऑगस्ट : महिन्याच्या पूर्वार्धात अपेक्षितांचे विवाह जमण्याचे योग आहेत. स्थावर, शेती आदींचे व्यवहार करताना काळजी घेणे आवश्यक आहे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवून काम करू नका. भागीदारी व्यवसायात मोठी जोखीम सध्या न घेतलेली हितावह आहे. नोकरीत परिस्थिती सामान्य राहील. वरिष्ठांचा दबाव वाढेल. कर्तव्यबुद्धी ठेवून काम करा फार समस्या जाणवणार नाहीत. बाकी मन प्रसन्न राहील. देवधर्मासाठी पैसा खर्च कराल. बोलताना सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्या. जोडीदाराशी उत्तम ताळमेळ जुळेल.
महिलांसाठी खर्चाचा योग दिसतो, मात्र अतिखर्च होणार नाही, याची काळजी घ्यावी. दगदग होईल. प्रकृतीची काळजी घ्या.
विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ. अभ्यासात मन लागेल. नवे मित्र जोडताना काळजी घ्या. आई-वडिलांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.
अनुकूल दिवस
१, ८, ९, १०, ११, १४, १८, २५, २६, २७, २८, २९
सप्टेंबर : केतू उपासनेस चांगला आहे. इष्टदैवताची, कुलदैवताची आराधना कराल. इच्छुकांचे विवाह जुळण्यासाठी अनुकूल काळ आहे. कुटुंबात मंगलकार्य होईल, असे दिसते. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. नवीन मित्र बनतील. व्यवसायात संघर्ष होईल; पण चांगली सफलता मिळेल. पैसा जपून वापरा. या महिन्यात कर्ज, उधारी घेणे पूर्णतः टाळा. रागावर व वाणीवर नियंत्रण ठेवावे. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग येऊ शकतो. जमीन अथवा घराशी निगडित कामात आर्थिक लाभ. आहारावर नियंत्रण ठेवा. हितशत्रूंपासून सावधान.
महिलांनी मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. अतिविचार व नैराश्यापासून दूर राहावे. छोट्या-छोट्या गोष्टींचा ताण घेऊ नका.
विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. अभ्यासात मन लागेल. यशप्राप्तीचेही योग आहेत.
अनुकूल दिवस
४, ५, ६, ७, १०, १३, १४, २१, २२, २३, २४, २५
ऑक्टोबर : कोर्टकचेरीची कामे, आर्थिक कामे व इतर महत्त्वाची कार्ये महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात करणे बरे. प्रवासाचे योग आहेत. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. गुंतवणूक करताना विवेकाने निर्णय घ्या. घाईगडबड नको. व्यवसायात धाडसाने निर्णय घ्याल. साहित्य, संगीतात रस घ्याल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत कोणत्याही वादात पडू नका. हाताखालचे लोक सहकार्य करतील. वरिष्ठांना मान द्या. महिन्याच्या शेवटी तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. स्थावर खरेदीचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
महिलांसाठी करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला बरा. घरातील लहानग्यांची काळजी घ्या. त्यांच्या उपद्व्यापाकडे लक्ष द्या.
विद्यार्थ्यांसाठी चांगला महिना आहे. वादविवाद टाळा. अभ्यासाला गती येईल, अवांतर वाचन वाढवावे.
अनुकूल दिवस
१, २, ३, ४, ८, ११, १८, १९, २०, २२, २९, ३०, ३१
नोव्हेंबर : दूरच्या सुखकारक प्रवासाचे योग संभवतात. काहींना परदेश प्रवासाचे योग. गुरू महाराज शुक्राबरोबर शुभ योगात आहेत. शेतीतील कामे मार्गी लागतील. महत्त्वाची कामे महिन्याच्या पूर्वार्धात करणे हितकारक आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. पण खर्चही वाढेल. आरोग्य बरे राहील. आध्यात्मिक विषयात मन लागेल. सामाजिक प्रतिष्ठा वृद्धिंगत होण्याचे योग आहेत. नोकरीत वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठराल. नोकरीच्या ठिकाणी वेळ वाया न घालवणे इष्ट. व्यवसायात आर्थिक प्राप्ती चांगली राहील. भागीदाराशी जुळवून घ्या.
महिलांचे घरात कौतुक होईल. घरातील ज्येष्ठांशी वाद नकोत. एखादी आवडीची वस्तू घेण्यासाठी खर्च होईल. फक्त हिशोबाचा ताळमेळ लागेल असे पाहा.
विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. अधिकाधिक यशासाठी प्रामाणिक प्रयत्न करा.
अनुकूल दिवस
१, ४, ७, ८, १५, १७, १८, २५, २६, २७, २९
डिसेंबर : आरोग्य बरे राहील. नावलौकिक, सामाजिक प्रतिष्ठेची प्राप्ती होईल. द्वितीय स्थानातील शनि महाराज जमीन, शेतीत फायदा दाखवत आहेत. शेतीत नवनवीन प्रयोग राबवून ते यशस्वी कराल असे दिसते. मनात सकारात्मकता राहील. नोकरीत प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखीचा फायदा होईल. नोकरी बदलणार असाल, तर सावधगिरी बाळगून निर्णय घ्यावा. व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. सोबत एखादा जोडधंदा सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्याल.
महिलांना भावंडांसोबत वेळ घालवण्यासाठी उसंत मिळेल. कोणताही मोठा निर्णय घेणे थोडे पुढे ढकललेले बरे. वेळेची वाट पाहा आणि मगच निर्णय घ्या.
विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करावा. शिक्षकांकडून कौतुकाचे प्रसंग येतील. भावंडांना सांभाळून घ्या.
अनुकूल दिवस
१, ४, ५, १२, १३, १४, १६, २२, २३, २४, २५, २९





