breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मांची नियुक्ती

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली होती. काँग्रेस नेते नाना पटोलेंसह विरोधकांकडून रश्मी शुक्ला यांची निवडणुकीपूर्वी बदली करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली करण्यात आली होती. यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची वर्णी लागणार याची सातत्याने चर्चा रंगली होती. अखेर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश दिले होते. यात मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितेश कुमार या तीन नावांचा समावेश होता. अखेर आज वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा     –        निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वाहनाचे टायर जाळण्याच्या प्रयत्नामागे निवडणुकीचे कारण नाही; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे 

संजय वर्मा 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते महाराष्ट्रात कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकपदासाठी संजय वर्मा यांचे नाव आघाडीवर होते. एप्रिल 2028 मध्ये ते पोलीस सेवेतून निवृत्त होतील

रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे त्या वारंवार वादात अडकल्या होत्या. याआधी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी रश्मी शुक्ला अवैध पद्धतीने फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप केला होता.

रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. यानंतर आता राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button