आमदार महेश लांडगे यांच्यामुळे सरसकट शास्तीकर मुक्ती!
- राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल : शहराच्या मानगुटीवरील भूत उतरवले..!
पिंपरी । प्रतिनिधी
राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची केंद्रात, राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता असताना आम्ही शास्तीकर आणि साडेबारा टक्के परताव्याच्या प्रश्नासाठी मोठा पाठपुरावा केला. पण, खऱ्या अर्थाने भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या मानगुटीवरून शास्तीकराचे भूत उतरवण्याचे काम आमदार महेश लांडगे यांनी केले, असे गौरोवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांनी काढले. तसेच, गेल्या १० वर्षांत खऱ्या अर्थाने शहरातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम महेश लांडगे यांनी केले, असा दावाही बहल यांनी केला आहे. भाजपा- शिवसेना- एनसीपी- आरपीआय महायुतीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी योगेश बहल बोलत होते.
यावेळी महायुतीचे समन्वयक श्री. विजय फुगे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट, माजी महापौर तथा भोसरी विधानसभा समन्वयक मंगला कदम, माजी नगरसेवक पंडित गवळी, माजी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे, संघटक सचिव प्रकाश सोमवंशी, उपाध्यक्ष संदिपान झोंबाडे, ज्ञानेश्वर कांबळे तसेच कुशाग्र कदम, सचिन आवटे, संजय आहेर, कांता मुंडे, प्रदीप आवटे, सचिन दुधाळ, मनीषा गटकळ, कविता गराडे, विनोद वरखडे, श्रीकांत कदम, ज्योती गोफणे, रमेश गुंड, गंगा धेंडे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध सेलचे महायुती तसेच शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी योगेश बहल पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचा शास्तीकराचा प्रश्न सोडवण्यासाठी या शहरातील तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महापौर या नात्याने मी देखील अनेक वेळा सरकार दरबारी खेटे घातले. केंद्रात, राज्यात आमची सत्ता होती. मात्र प्रामाणिकपणे कबुली दिली पाहिजे की आमच्या पाठपुराव्यानंतरही शास्तीकराचा प्रश्न सुटला नाही. मात्र, हा प्रश्न आमदार महेश लांडगे यांनी वेळोवेळी पाठपुरावा घेऊन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सोडवला. या शहरातील शास्तीकराचे भूत आपल्या मानगुटीवरून उतरवले. विविध कामांसाठी या शहरातील जमिनी संपादित केल्या. त्या भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम महेश लांडगे यांनी केले त्यांनी साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्नही मार्गी लावला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम गेल्या दहा वर्षात महेश लांडगे यांनी केले आहे.
महायुतीचे एकजुटीने काम करा : माजी महापौर मंगला कदम
मंगला कदम म्हणाल्या की, घरामध्ये जसे आपण वडीलधाऱ्या व्यक्तींचे ऐकतो. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आचरणात आणतो. तसेच पक्षातील श्रेष्ठ, ज्येष्ठ पदाधिकारी, आपले नेते यांचे आपण ऐकले पाहिजे. कारण आपण पक्ष संघटना म्हणून काम करत असतो. त्यामुळे आपल्या पक्षातील आपले नेते अजित पवार यांनी एखादी गोष्ट ठरवली आहे. तर त्यांच्या निर्णयाशी सहमत राहून पुढे चालत राहणे हे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचे काम आहे. म्हणून आपण महेश लांडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे आहे. महेश लांडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मिळणारे ‘लीड’ हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे अजित पवार यांच्यावरील प्रेम व्यक्त करणार आहे. आपली निष्ठा यातूनच कळणार आहे. म्हणून आपल्याला महायुतीचे काम करायचे आहे.
आमदारांच्या हॅट्रिकमध्ये राष्ट्रवादीचे योगदान असेल : पंडित गवळी
महेश लांडगे यंदा हॅट्रिक करणार याबद्दल कोणीही दुमत बाळगण्याचे कारणच नाही. त्यांचे काम ही त्यांच्या यशाची पोचपावती ठरणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे योगदान मोठे असेल याची ग्वाही मी देतो. जात, धर्म, माणूस, पक्ष या पलीकडे जाऊन काम करणे हे एकमेव ध्येय महेश लांडगे यांचे आहे. महायुतीचा धर्म पाळून आपल्याला काम करायचे आहे. आगामी काळात अजित पवार यांना पाठिंबा व त्यांना बळ देण्यासाठी महेश लांडगे यांना या मतदारसंघातून विधिमंडळापर्यंत पोहोचवण्याचे काम नव्हे आपली जबाबदारी आहे आणि ती आपण सक्षमपणे पार पाडायचे आहे. विविध सेल, आघाड्या आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महेश लांडगे यांना भरघोस मतांचे लीड मिळवून देण्याचे काम आपले आहे राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्ष म्हणून आपली ती जबाबदारी असणार आहे.