सांगली हादरली; कुत्र्यासह तीन भावंडं वाहून गेली
सांगली – सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील घाणंद गावात तीन भावंडं कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यात दोन सख्खे भाऊ आणि एका चुलत भावाचा समावेश आहे. ही तीनही भावंडे कालव्यावर मासेमारीसाठी आणि कुत्रा धुवण्यासाठी गेली होती. त्याचवेळी कुत्र्यासह तिघेही वाहून गेले. आतापर्यंत तीन भावंडांपैकी एकाच मृतदेह सापडला असून दोन सख्ख्या भावंडांचा शोध सुरू आहे, तर कुत्र्याचा मृतदेहही हाती लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंदा अंकुश व्हनमाने, विजय अंकुश व्हनमाने ही दोन सख्खी भावंडे असून त्यांचे वय प्रत्येकी 14 आणि 17 वर्षे आहे, तर वैभव लहू व्हनमाने हा 14 वर्षांचा असून तो चुलत भाऊ आहे. या तिघांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता, मात्र आज सकाळी केवळ वैभव लहू व्हनमाने याचा मृतदेह हाती लागला.
दरम्यान, लहू व्हनमाने हे स्वत:चा मुलगा वैभव आणि भावाची दोन मुलं आनंद, विजय यांना घेऊन काल दुपारी तीन वाजता मासेमारीसाठी शेताकडे आले होते. त्यांच्या सोबत त्यांचा पाळीव कुत्रा लुशीदेखील होता. बंधाऱ्यावर गेल्यानंतर लहू व्हनमाने यांना फोन आला आणि ते मुलांना व कुत्र्याला तिथेच सोडून निघून गेले. मात्र परत आले तेव्हा तिथे कोणीच नव्हते. काही वेळ त्यांनी स्वतः शोधाशोध केली परंतु सायंकाळ झाली तरी मुलं भेटली नाहीत. मग कुटंबिय आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. शेवटी रात्री आठ वाजता घाणंद तलावातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या कालव्याजवळ विजय आणि आनंदा यांचे कपडे, चप्पला सापडल्या. परंतु वैभवचे मात्र काहीच सापडले नाही. तसेच कुत्र्याचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात सापडला. तर घटनास्थळावरच बकेट आणि त्याला बांधलेली दोरीही सापडली. त्यावरूनच काहीतरी दुर्घटना घडल्याचा अंदाज बांधला जातो आहे. तसेच या घटनेमुळे व्हनमाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.





