पिंपरी-चिंचवडला मिळणार ‘पुस्तकांची नगरी’ म्हणून नवी ओळख
सीएसआर निधीतून साकार होणार ‘अक्षरविश्व’ ज्ञानसंकुल; महापालिकेवर एक रुपयाचाही आर्थिक भार नाही

पिंपरी | पिंपरी चिंचवड शहराला केवळ औद्योगिक नगरी म्हणून नव्हे, तर ज्ञान, साहित्य, संस्कृती आणि संशोधनाचे केंद्र म्हणून नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने महापौर भा. रवि लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘अक्षरविश्व’ या अत्याधुनिक ज्ञानसंकुलाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत आहे. १५ जून २०२६ रोजी झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मौजे भोसरी (कासारवाडी) येथील सार्वजनिक सुविधा क्षेत्रातील सुमारे ८,८३१.३६ चौरस मीटर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक ग्रंथालय आणि ज्ञानसंकुल उभारण्याच्या उपसूचनेस मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प आनंदग्राम सामाजिक सेवाभावी संस्था, भोसरी यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण ‘अक्षरविश्व’ ज्ञानसंकुल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीतून उभारण्यात येणार असून महानगरपालिकेच्या निधीतील एकही रुपया खर्च होणार नाही. त्यामुळे शहरवासीयांना जागतिक दर्जाच्या ज्ञानसुविधा उपलब्ध होणार असून त्यासाठी महापालिकेवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. विशेष म्हणजे, प्रकल्पासाठी निधी कमी पडल्यास स्वतः आर्थिक योगदान देण्याची तयारी महापौर रवि लांडगे यांनी दर्शविली आहे.
‘अक्षरविश्व’ हे केवळ ग्रंथालय नसून एक सर्वसमावेशक ज्ञानसंकुल असेल. यामध्ये अत्याधुनिक ग्रंथालय, डिजिटल अभ्यासिका, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, संशोधन सुविधा, मराठी साहित्य परिषद कार्यालय, मनोमय कक्ष, व्याख्यान सभागृह, लेखक संवाद केंद्र, पुस्तक प्रकाशनासाठी स्वतंत्र सभागृह तसेच विविध शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
महापौर रवि लांडगे यांची संकल्पना शहरातील विद्यार्थी, युवक आणि अभ्यासकांना पुणे, मुंबई अथवा इतर महानगरांमध्ये उपलब्ध असणाऱ्या दर्जेदार ज्ञानसुविधा पिंपरी-चिंचवडमध्येच उपलब्ध करून देण्याची आहे. आज अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि संशोधनासाठी इतर शहरांकडे वळतात. मात्र ‘अक्षरविश्व’ उभारल्यानंतर पिंपरी-चिंचवड हेच अभ्यास, संशोधन आणि वाचन संस्कृतीचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित होणार आहे.
या ज्ञानसंकुलामुळे राज्यातील आणि देशातील नामवंत लेखक, साहित्यिक, कवी, विचारवंत, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचे शहरात सातत्याने आगमन होईल. साहित्य संमेलने, पुस्तक प्रदर्शने, व्याख्यानमाला, लेखक भेट कार्यक्रम, चर्चासत्रे आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे शहरात समृद्ध बौद्धिक वातावरण निर्माण होईल.
हेही वाचा
भिवंडीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त
येत्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवडची ओळख केवळ उद्योगनगरी म्हणून नव्हे, तर ‘पुस्तकांची नगरी’, ‘ज्ञाननगरी’ आणि ‘वाचन संस्कृतीचे केंद्र’ म्हणून निर्माण करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. महाराष्ट्रातील अनेक नामवंत लेखक, साहित्यिक आणि प्रकाशन संस्थांचे हे आवडते केंद्र बनू शकते.
महापौर रवि लांडगे यांनी शहराच्या विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक केला आहे. रस्ते, पूल, पाणीपुरवठा आणि इतर भौतिक सुविधांसोबतच भावी पिढ्यांसाठी ज्ञानाची भक्कम पायाभूत सुविधा निर्माण करणे तितकेच महत्त्वाचे असल्याची भूमिका त्यांनी सातत्याने मांडली आहे. ‘अक्षरविश्व’ ही त्याच दूरदृष्टीची फलश्रुती आहे.
विशेष म्हणजे, या प्रकल्पाची संपूर्ण अंमलबजावणी पारदर्शक, नियमबद्ध आणि सार्वजनिक हिताला केंद्रस्थानी ठेवून करण्यात येणार आहे. उभारण्यात येणाऱ्या सर्व सुविधा शहरातील नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध राहणार असून ही वास्तू पिंपरी-चिंचवडच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक वैभवाची नवी ओळख ठरणार आहे.
उद्योगनगरी म्हणून देशभरात नाव कमावलेल्या पिंपरी-चिंचवडला आता ‘ज्ञाननगरी’ आणि ‘पुस्तकांची नगरी’ म्हणून नवी ओळख मिळवून देणे, हीच ‘अक्षरविश्व’मागची प्रेरणा आहे. भावी पिढ्यांसाठी ज्ञानाचा कायमस्वरूपी ठेवा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. ‘अक्षरविश्व’ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो केवळ एका इमारतीपुरता मर्यादित राहणार नाही, तर पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि बौद्धिक पुनर्जागरणाचा भक्कम पाया ठरेल.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.





