विमान अपघातावरून राज ठाकरेंनी व्यक्त केला संशय; बोईंग ड्रीमलायनर विमानांबाबत दिली महत्त्वाची माहिती

Raj Thackeray : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा आज दुपारी अपघात झाला. एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ या विमानाने दुपारी १.३८ मिनिटांनी उड्डाण घेतले. मात्र अवघ्या काही मिनिटांतच ते कोसळले. या अपघातानंतर भारतासह जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सर्वांनीच या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत मृतांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे. पण यानिमित्ताने त्यांनी काही परखड सवालही उपस्थित केले आहेत.
राज ठाकरे म्हणाले की, अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुःखद घटना आहे. या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. तसंच जखमी लवकरात लवकर बरे होऊ देत आणि सुखरूप घरी जाऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
यानंतर त्यांनी अपघातग्रस्त बोईंग ड्रीमलाईनर या विमानाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या कंपनीच्या अनेक विमानांचा जगभरात वारंवार अपघात होत असल्याकडे त्यांनी लक्ष वळविले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमात छापून आलेल्या बातम्यांचाही हवाला दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले, “विमान तंत्रज्ञानाबद्दल जरी मला खूप खोल माहिती नसली तरी माझ्या वाचनात काही गोष्टी याच्या आधी पण आल्या होत्या, त्यातून मला काही प्रश्न पडले. बोईंगच्या ‘ड्रीमलाईनर’ विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या. २०१३ ला पहिल्यांदा जपान एअरलाईन्सच्या विमानाला आग लागली होती. त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या. त्या इतक्या होत्या की २०२० ते २०२३ या काळात अनेकदा या विमानांच उड्डाण थांबवले गेले होते. जानेवारी २०१३ ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास ३ महिने बोईंग ड्रीमलाईनरचं उड्डाण खंडित केले होते. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे २०१३ ला भारतात डीजीसीएने देखील काही काळासाठी या विमानाचे उड्डाण खंडित केले होते.”
हेही वाचा – Ahmedabad Plane Crash : ‘सव्वा लाख लिटर इंधनामुळे कुणालाच वाचवता आले नाही’; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
राज ठाकरेंनी उपस्थित केले हे प्रश्न
जर ड्रीमलाईनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहित असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो?
डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली?
आजच्या विमान अपघाताविषयी वाचताना अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे हे विमान २८ जानेवारी २०१४ ला एअर इंडियाच्या सेवेत आले. थोडक्यात जगभरात जेंव्हा ड्रीमलाईनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणले, असेही राज ठाकरे पुढे म्हणाले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, ही वेळ हे सगळं बोलण्याची नाही असे म्हटले जाईल. जी घटना घडली ती दुःखद आहे पण म्हणून या विषयावर सरकारने आता तरी गांभीर्य दाखवायलाच हवं. ड्रीमलाईनर्स जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर कुठलाही दबाव न सहन करता याची सेवा खंडित करावी आणि वेळेस आधीची ऑर्डर रद्द करावी.





