Ahmedabad Plane Crash : ‘सव्वा लाख लिटर इंधनामुळे कुणालाच वाचवता आले नाही’; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

अहमदाबाद : एअर इंडियाच्या AI-171 विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. अहमदाबादहून लंडनला निघालेल्या या विमानाच्या भीषण अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. “विमानात सव्वा लाख लिटर इंधन होते. प्रचंड तापमानामुळे कुणालाच वाचवण्याची संधी मिळाली नाही,” असे त्यांनी सांगितले. एकमेव प्रवासी, विश्वशकुमार रमेश, सुदैवाने बचावला असून, शाह यांनी त्याला भेट दिली.
शाह म्हणाले, “अपघातानंतर १० मिनिटांतच भारत सरकारला माहिती मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने संपर्क साधला. गुजरात सरकार, आरोग्य विभाग, फायर ब्रिगेड, पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाने (CAPF) तत्परतेने बचावकार्य केले.” विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी सुरू आहे. गुजरातमधील फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ लवकरच चाचण्या पूर्ण करेल. नातेवाइकांसाठी राहण्याची आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा – अहिल्यानगर महापालिकेसह १२ पालिकांसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर
विदेशी नातेवाइकांना माहिती देण्यात आली असून, त्यांच्या आगमनानंतर डीएनए नमुने घेतले जातील. मृतदेहांची ओळख पटल्यानंतरच अधिकृत आकडेवारी जाहीर होईल. नागरी उड्डयन मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे. “हा अपघात आहे, तो रोखता येत नाही. पण गुजरातच्या आपत्ती व्यवस्थापनाने तत्परता दाखवली,” असे शाह म्हणाले. देशवासीयांच्या वतीने त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. अहमदाबाद पोलिसांनी हेल्पलाइन (०7925620359) जारी केली आहे.