‘पशुसंवर्धन व्यवसायास कृषीचा दर्जा देण्यासाठी सकारात्मक’; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: राज्याच्या पशुसंवर्धन व्यवसायास मत्स्य उद्योगाप्रमाणे कृषीचा दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव वित्त व नियोजन विभागाकडे आलेला आहे. ज्यामुळे पशुपालकांना कृषी क्षेत्राप्रमाणे पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध होण्यास मदत होईल.
त्यावर सकारात्मकतेने हा विषय पुढे नेऊन फिशरीजप्रमाणे पशुसंवर्धनलाही कृषी विभागाचा दर्जा दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. आरोग्यासाठी स्वच्छतेला महत्त्व असून, राज्यातच प्लास्टिक बंदीसाठी मी आग्रही राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले
औंध येथे पशुसंवर्धन आयुक्तालयातंर्गत जैव सुरक्षा स्तर-2 (बीएसएल-2) व स्तर- 3 (बीएसएल- 3) प्रयोगशाळा, राष्ट्रीय संदर्भीय लस चाचणी गुणनियंत्रण प्रयोगशाळा आणि सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि.24) सायंकाळी झाले. त्यानंतर कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, आमदार उमा खापरे, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासचे सचिव डॉ. रामास्वामी एन, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे व मान्यवर उपस्थित होते.
पशुसंवर्धन विभागास निधी कमतरता पडू दिली जाणार नाही. पशुसंवर्धनाशी निगडीत देशात महाराष्ट्र पुढे असलो तरी अंडी उत्पादन व कुक्कुटपालनात सहाव्या-सातव्या क्रमांकावर आहोत. आपले शेतकरी कर्तबगार आहेत.
त्यांना या क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी विविध सुविधा, सवलती आणि प्रोत्साहन दिले की तो त्या संधीचे सोनं करतो. म्हणून पशुपालकांचे, शेतकर्यांच्या उत्पन्न दुप्पट करायचे आहे. अलिकडच्या काळात प्राण्यांपासून माणसांना अनेक आजार होतात, त्यामुळे याबाबतीतही अधिक संशोधन आणि लस निर्मिती होणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.
हेही वाचा – दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”
पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, विभागात प्रथमच समुपदेशनाद्वारे जवळपाच 560 बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये 99 टक्के अधिकार्यांना त्यांच्या इच्छेच्या ठिकाणी बदल्या मिळाल्या. पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा मिळावा. दूध भेसळीला अटकाव करण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाईल.
गाई-पशु हे उघड्यावरील प्लास्टिक खात असल्याने त्याचे अंश दुधात येऊन बालकांना अनेक आजार जडत आहेत, याबाबत जनजागृती होण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनापासून म्हणजे दि 6 जूनपासून प्लास्टिक बंदीची मोहिम राबवि ण्यात येणार आहे. त्यावर अजित पवार यांनीही या मुद्द्यावर भाष्य करताना राज्यात प्लास्टिक बंदीसाठी मी आग्रही राहणार असल्याचे स्पष्ट केले.
पशुसंवर्धन सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी विभागाच्या कामाचाआढावा घेतला.पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी आभार मानले. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अनिल देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
प्रयोगशाळेच्या उद्घाटनानंतर मी तिथे बघितले आणि नेमकी मला घाण दिसलीच. परदेशात गेल्यावर आपण कोणीही कचरा टाकत नाही. कारण, भीती असते की पकडल्यास चक्की पिसिंग अॅण्ड पिसिंग अॅण्ड पिसिंग…. असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट आणि हास्यकल्लोळ झाला. येथे आल्यावर एअरपोर्टला उतरलं की कोठेही काही कचरा टाकतो. आपल्याकडे आओ जावो घर तुम्हारा. तिकडे गेल्यावर सुतासारखे सरळ वागता आणि येथे आल्यावर वाटेल तसे वागता. मी स्वच्छतेचा भोगता आहे.