रेल्वेने फिरायला निघण्याचा बेत? रेल्वे आसन आरक्षण तक्त्यासंदर्भात मोठा निर्णय

नाशिक : रेल्वे प्रवासात आपले आसन आरक्षितसंदर्भात मोठी समस्या असते. आसन आरक्षित झाले की नाही, त्याची निश्चित माहिती मिळत नाही, तोपर्यंत प्रवाशांच्या मनात धाकधूक असते. प्रवासाचे नियोजन करण्यात प्रवाशांना अडथळा येतो. परंतु, रेल्वेने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे नाशिकसह इतर ठिकाणच्या रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे भारतीय रेल्वेने आरक्षण अर्थात रिझर्व्हेशन तक्का तयार करण्याच्या प्रक्रियेत बदल केले असून त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून होणार आहे..
रेल्वे प्रवास हा बहुतेकवेळा कटकटीचा आणि त्रासदायक समजला जातो. त्यास कारणही तसेच आहे. मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असल्याने आसन आरक्षित करण्यास प्रवासी प्राधान्य देतात. परंतु, आसन आरक्षितसंदर्भातील स्थिती रेल्वे प्रवाशांना निश्चित वेळेत मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होते. यावर आता रेल्वे बोर्डाने एक निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेल्वे प्रवाशांना १० तास आधी आपल्या तिकिटासंदर्भात म्हणजेच आसन व्यवस्थेसंदर्भातील माहिती मिळणार आहे.
आधी रिझर्व्हेशन तक्ता गाडी सुटण्याच्या केवळ आठ तास आधी तयार केला जात होता. त्यामुळे केवळ काही तास आधी गाडीची स्थिती अर्थात वेटिंग लिस्ट, आरएसी सीटबाबत माहिती मिळत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे लांबून प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. प्रवासी आरक्षण तक्ता तयार होण्यापूर्वीच स्थानकात पोहचतात. स्थानकात गेल्यावर त्यांना त्यांचे तिकीट कन्फर्म झालेली नसल्याची माहिती मिळते, असेही होते. यामुळे प्रवाशांना वेळेचा फटका तसेच मनस्तापही सहन करावा लागतो. रेल्वे मंडळाने केलेल्या नवीन बदला्मुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. दूर-दूरच्या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी प्रवास उपलब्ध करून देणे, त्यांची चिंता कमी करणे, हा यामागील रेल्वेचा उद्देश आहे. नवीन निर्णयाचा प्रवाशांना फायदा झाल्यास भविष्यात आरक्षण तक्ता तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणखी कमी केला जाण्याची शक्यता आहे.
नवीन आरक्षण तक्ता नियमांमधील बदलानुसार सकाळी पाच ते दुपारी दोन या वेळेतन सुटणाऱ्या गाड्यांसाठी: पहिला आरक्षण तक्ता आदल्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत तयार होईल. दुपारी २:०१ ते मध्यरात्री १२ या वेळेत सुटणाऱ्या गाड्यांसाठी: पहिला आरक्षण तक्ता रेल्वे सुटण्याच्या १० तास आधी तयार होईल. मध्यरात्री १२ ते पहाटे पाच या वेळेत सुटणाऱ्या गाड्यांसाठी: पहिला आरक्षण तक्ता रेल्वे सुटण्याच्या १० तास आधी तयार होईल. या बदलामुळे वेटिंग लिस्ट (WL) आणि आरएसी स्थिती प्रवाशांना लवकर कळेल: यामुळे प्रवाशांना कन्फर्मेशनची माहिती लवकर मिळू शकेल. अंतिम मिनिटातील गैरसोय कमी होईल: प्रवाशांना प्रवासाची तयारी करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. नवीन बदलामुळे रेल्वे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करण्यास मदत होऊ शकेल.





