पालखी सोहळ्यातील पालखी रथाला भाविकांकडून फुलांची सजावट
श्री संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा अहिल्यानगरीत मुक्कामाला

अहिल्यानगर : श्री संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा दोन दिवस अहिल्यानगरीत मुक्कामाला होता. दिंडी सोहळ्यातील पालखी रथ सर्वांचे आकर्षण ठरले. या पालखीच्या सौंदर्याला विविध फुलांच्या गंध लाभला.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज पालखी व दिंडीचे प्रस्थान झाल्यापासून ठिकठिकाणी भाविकांकडून उत्साहात स्वागत केले जाते. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर दिंडीमध्ये सुमारे १५ हजार वारकऱ्यांचा सहभाग आहे. ही दिंडी ४०० किलोमीटर पायी अंतर पूर्ण करत विठ्ठलाच्या दर्शनाला जाते. या दिंडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण पालखी आहे. पालखीसह वारकऱ्यांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. या पालखी सोहळ्यातील पालखी रथाला फुलांची सजावट भाविकांकडून केली जाते. विशेष म्हणजे प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांकडून ही सजावट केली जाते. पालखी सोहळ्यात पालखी रथाच्या फुलांचा सुगंध एक आध्यात्मिक, शांततादायक व भक्तिमय अनुभव असतो. तो केवळ सजावटीपुरता नसून, तो वातावरणात एक पवित्र भाव निर्माण करतो. यामुळे वारकऱ्यांसह भाविकांमध्ये प्रसन्न वातावरण रहाते.
अहिल्यागनगर येथे संत निवृत्तिनाथ महाराज पालखी मुक्कामाला राहिल्यानंतर पालखी रथाची सजावट करण्याची जबाबदारी जयभोले ट्रेकर ग्रुपची आहे. या ग्रुपचे सर्वच सदस्य तसेच सर्व फुल विक्रेते एकत्र येत पालखी रथाच्या सजावटीचे काम करतात. ही सजावट करण्यासाठी सुमारे दीड लाखांचा खर्च येतो. या सजावटीच्या कामासाठी २४ तासांचा अवधी लागतो. यासाठी ५० जण कार्यरत असतात. ७०० किलोपेक्षा जास्त फुलांचा समावेश करून पालखीची सजावट केली जाते.
धार्मिक पुस्तकांची रेलचेल
श्री संतश्रेष्ठ निवृत्तिमहाराज दिंडी दोन दिवस दिंडी मुक्कामाला येत असल्यामुळे वारकऱ्यांसह शहरातील भाविकांना आध्यात्मिक पुस्तके घेता यावी, या उद्देशाने पुणे येथील गुरुप्रकाश ग्रंथ भंडारचे अशोक रुपनर स्टॉल लावत आहे. यामुळे वारकऱ्यांबरोबरच भाविकांना आध्यात्मिक पुस्तकांसह चंदन, अष्टगंध, तुळसीमाळा आदी साहित्य खरेदी करता येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा स्टॉल नगरमध्ये रुपनर लावत आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पालखी रथाच्या सजावटीचे काम जयभोले ट्रेकर ग्रुप करीत आहे. पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून हे काम सुरू आहे. पालखी रथाची सजावट करताना ग्रुपचे सदस्य व फूल व्यावसायिक यामध्ये सहभागी होतात. सजावट करताना दरवर्षी आकर्षक अशी सजावट केली जाते.
– अजय गाढवे, फुले व्यावसायिक, अहिल्यानगर