Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्जत-लोणावळा घाटातील एक रेल्वे मार्गिका सुरू; दोन मार्गिकांवरील दुरुस्ती युद्धपातळीवर

भूस्खलनानंतर तब्बल ४५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मध्यम मार्गिका वाहतुकीसाठी खुली; मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक अद्याप धीम्या गतीने सुरू

मुंबई-पुणे: रेल्वे मार्गावरील कर्जत-लोणावळा घाट विभागात झालेल्या भूस्खलनानंतर मध्य रेल्वेने तब्बल ४५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मंकी हिल–ठाकूरवाडी दरम्यानची मध्यम मार्गिका मंगळवारी रात्री १०.५० वाजता वाहतुकीसाठी सुरू केली. या मार्गावर सध्या ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादेने रेल्वेगाड्या चालविण्यात येत असून मुंबई-पुणे अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

मात्र, घाट विभागातील उर्वरित दोन रेल्वे मार्गिका अद्याप बंद असून त्या सुरक्षित करण्यासाठी देखभाल आणि दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

हेही वाचा –  वाईट खेळलो; ही २०० धावांची खेळपट्टी नव्हती… कर्णधार श्रेयसनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

सलग तीन भूस्खलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प

रविवारी मध्यरात्री ठाकूरवाडी-मंकी हिल दरम्यान प्रथम भूस्खलन झाले. त्यानंतर काही मिनिटांतच अप मुख्य मार्गावर दुसरे आणि खंडाळा-मंकी हिल दरम्यान तिसरे भूस्खलन झाल्याने घाट विभागातील परिस्थिती गंभीर बनली.

यानंतर सोमवारी सकाळी खंडाळा स्थानकाजवळ डाऊन मुख्य मार्गावर झाड कोसळल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

४०० हून अधिक कर्मचारी दुरुस्तीच्या कामात

रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीच्या कामासाठी ४०० हून अधिक कर्मचारी, अभियंते, १० ते १२ जेसीबी आणि अन्य अवजड यंत्रसामग्री तैनात केली होती. रुळांवर साचलेली माती, दगड आणि झाडे हटविण्यासोबतच रेल्वे मार्गाची तपासणी, स्थिरता चाचणी आणि तांत्रिक दुरुस्तीचे काम प्रतिकूल हवामानातही अखंड सुरू ठेवण्यात आले.

या प्रयत्नांनंतर मध्यम मार्गिका सुरू करण्यात यश आले असून, पूर्वी पर्यायी मार्गांवर वळविण्यात आलेल्या काही रेल्वेगाड्या आता त्यांच्या मूळ मार्गावरून धावू लागल्या आहेत.

उर्वरित दोन मार्गिका अद्याप बंद

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, उर्वरित दोन मार्गिकांवरील दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून संपूर्ण सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतरच त्या वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येतील.


घटनाक्रम : रेल्वे वाहतुकीवरील परिणाम

रविवार, ५ जुलै

  • रात्री १.५५ – ठाकूरवाडी-मंकी हिलदरम्यान पहिले भूस्खलन.

  • रात्री २.०६ – अप मुख्य मार्गावर दुसरे भूस्खलन.

  • रात्री ३.०५ – खंडाळा-मंकी हिलदरम्यान तिसरे भूस्खलन.

सोमवार, ६ जुलै

  • सकाळी ९.१५ – खंडाळा स्थानकाजवळ डाऊन मुख्य मार्गावर झाड कोसळले.

  • घाट विभागातील तिन्ही रेल्वे मार्गिकांवरील वाहतूक पूर्णपणे बंद.

  • दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू.

मंगळवार, ७ जुलै

  • पावसाचा जोर कमी झाल्यानंतर दुरुस्तीला वेग.

  • रात्री १०.५० – मंकी हिल-ठाकूरवाडी मध्यम मार्गिका वाहतुकीसाठी सुरू.

बुधवार, ८ जुलै

  • मुंबई-पुणे अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वेगाड्या कमी वेगाने सुरू.

  • उर्वरित दोन मार्गिकांवरील देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button