आरबीआयने 100 रुपयांच्या नोटेबाबत दिला इशारा; महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

100 Rupee Note: व्यवहार करताना अनेकदा आपल्या हातात अशा नोटा येतात की त्या खऱ्या आहेत की बनावट, याबाबत संभ्रम निर्माण होतो. अशा फसवणुकीपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली आहे. या सात गोष्टी तपासून तुम्ही नोट खरी की बनावट हे सहज ओळखू शकता.
- प्रकाशात ‘100’ स्पष्ट दिसते
100 रुपयांच्या नोटेच्या डाव्या खालच्या भागात सी-थ्रू रजिस्टर असते. नोट प्रकाशासमोर धरल्यास येथे ‘100’ हा आकडा स्पष्टपणे दिसतो. हे अस्सल नोटेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
- देवनागरीत ‘१००’ लिहिलेले असते
अस्सल नोटेवर इंग्रजीसोबतच देवनागरी लिपीत ‘१००’ असेही छापलेले असते. बनावट नोटांमध्ये हा तपशील अनेकदा चुकीचा किंवा अस्पष्ट असू शकतो.
- मध्यभागी महात्मा गांधींचे चित्र
नोटेच्या समोरील बाजूच्या मध्यभागी महात्मा गांधी यांचे स्पष्ट आणि दर्जेदार छायाचित्र असते. चित्राची गुणवत्ता कमी किंवा धूसर वाटल्यास नोट नीट तपासा.
हेही वाचा – वाईट खेळलो; ही २०० धावांची खेळपट्टी नव्हती… कर्णधार श्रेयसनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?
- गव्हर्नरची स्वाक्षरी आणि RBI चे चिन्ह
नोटेच्या उजव्या बाजूला ‘मी धारकास…’ असे वचन (Promise Clause), RBI गव्हर्नरची स्वाक्षरी आणि रिझर्व्ह बँकेचे अधिकृत चिन्ह छापलेले असते.
- खालच्या उजव्या बाजूला नंबर पॅनल
नोटेच्या खालच्या उजव्या भागात एक सिरियल नंबर पॅनल असतो. त्यातील अक्षरे आणि अंक स्पष्ट, एकसारखे आणि योग्य क्रमाने छापलेले असतात.
- वरच्या डाव्या बाजूलाही नंबर पॅनल
नोटेच्या वरच्या डाव्या बाजूलाही दुसरा सिरियल नंबर असतो. दोन्ही नंबर पॅनलमधील फॉन्ट, आकार आणि छपाई अचूक असणे हे अस्सल नोटेचे वैशिष्ट्य आहे.
- अशोक स्तंभाचे राष्ट्रीय चिन्ह
नोटेच्या खालच्या उजव्या भागात अशोक स्तंभाचे राष्ट्रीय चिन्ह छापलेले असते. हे चिन्ह स्पष्ट आणि दर्जेदार असणे आवश्यक आहे.
फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
100 रुपयांची नोट स्वीकारण्यापूर्वी ही सात सुरक्षा वैशिष्ट्ये तपासल्यास बनावट नोट ओळखणे सोपे जाते. संशयास्पद नोट आढळल्यास ती पुढे वापरण्याऐवजी जवळच्या बँकेत किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावी.





