“मंत्री करायचं की नाही, हे राष्ट्रवादी ठरवणार”; छगन भुजबळ

नागपूर : ‘जे लोक माझ्यावर टीका करतात, त्यांना मी सांगू इच्छितो की, मी भाजपाचा मंत्री नाही, मी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्री आहे. मला मंत्री करायचं की नाही, हे राष्ट्रवादी ठरवते. तसे निर्देश देण्याचे काम मुख्यमंत्री करतात’, असे म्हणत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नागपूर दौऱ्यावर असताना आपल्यावर होणाऱ्या टीकांना प्रत्युत्तर दिले. मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच शुक्रवारी नागपूरला आले होते. विमानतळावर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
मंत्री भुजबळ म्हणाले की, “सरकार स्थापन होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्री बनवण्यासाठी प्रयत्न केला होता. फक्त तेच नाही तर दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यावेळी पक्षाने निर्णय घेतला आणि मी मंत्री होऊ शकलो नाही, असे भुजबळांनी स्पष्ट केले.
ओबीसी मुद्द्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, “सरकारमध्ये राहिलो किंवा नाही, याने काही फरक पडत नाही. ओबीसी समाजासाठी आम्ही कायम उभे आहोत. मागासवर्गीय समाजाच्या हक्कांसाठी आम्ही लढण्यास सदैव तयार आहोत. मंत्रिमंडळात असलो तर ती लढाई थोडी सोपी होते.” त्यांनी पुढे सांगितले की, “मी केवळ ओबीसी समाजाचाच नाही, तर राज्यातील सर्व लोकांचा मंत्री आहे.”
हेही वाचा – ठाकरे बंधूंच्या युतीचा खेळ होणार नाही; संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितले
मस्साजोग प्रकरणाममध्ये मंत्री धनंजय मुंडेंवर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी प्रकृतीचे कारण पुढे करताना राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाञाने राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक मंत्रीपदाची जागा शिल्लक राहिली होती. त्या जागेवर भुजबळांची निवड करण्यात आली.
याच आठवड्यात भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेवून अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कार्यभार स्विकारला. त्यामुळे राष्ट्रवादीतील माजी मंत्री असणारे धनंजय मुंडे नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबत विचारणा केली असता, भुजबळ म्हणाले, “कोणालाही मंत्री झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागला तर तो नाराज असतोच हा मानवी स्वभाव आहे.