महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास रखडला, विदर्भात वादळी पावसाचा इशारा

मुंबई | राज्यात मान्सूनच्या आगमनानंतर हवामानात अचानक बदल झाला असून, शेतकरी चांगल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, मान्सूनच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे १०-१२ जूनपर्यंत पावसाचा जोर कमी-अधिक राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी विदर्भातील काही भागांत वादळी वारे (५०-६० किमी/तास) आणि विजांसह पावसाचा इशारा जारी केला आहे. विशेषतः नागपूर, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. संध्याकाळनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये ताशी ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचा आणि जोरदार पावसाचा अंदाज आहे.
कोकणात हलक्या पावसाची शक्यता
कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी (५ जून) पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हेही वाचा : निशान-ए-पाकिस्तान’ चे मानकरी राहुल गांधीच ?
शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला
मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाचा अचूक माहिती घेऊनच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाचा इशारा
हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाऱ्यांचा वेग ४०-५५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. यामुळे मच्छिमारांनी सावधगिरी बाळगावी, असे हवामान विभागाने नमूद केले आहे.