निशान-ए-पाकिस्तान’ चे मानकरी राहुल गांधीच ?

पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आणि भारताने हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या कारवाईनंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये घुमशान सुरू आहे. भारताची बाजू घेऊन देशप्रेम दाखवणे हे अपेक्षित आहे. पण, अनेकांना पुळका आहे तो पाकिस्तानचा !
जणू काही पाकिस्तानचे प्रवक्तेच !
काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष, उबाठा गट यांनी उघड उघड भारताविरुद्ध भूमिका घेतली असून पाकचे प्रवक्ते असल्याप्रमाणे या पक्षांचे नेते बोलत आहेत. अर्थात, भारताने जागतिक पातळीवर भूमिका मांडण्यासाठी काही प्रतिनिधी पाठवले आहेत, त्यातील काँग्रेसचे नेते मात्र भारताची भूमिका मांडत आहेत. परतल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता जास्त आहे.
राहुल गांधी वादग्रस्तच..
काँग्रेस नेते राहुल गांधी हे पाकिस्तानची भूमिका जास्त भक्कमपणे मांडत आहेत आणि नरेंद्र मोदी हे कसे चुकले, याचे विश्लेषण करत आहेत. राहुल गांधी, विजय वडेट्टीवार किंवा संजय राऊत यांचे व्हीडिओज तर पाकच्या चॅनेल्स वरून प्रसारित होत आहेत आणि त्या आधारे भारतावर गरळ ओकण्याचा पाकड्यांचा धंदा सुरू आहे.
राहुल गांधी पाकमध्ये प्रसिद्ध..
सतत भारत द्वेषापोटी आणि नरेंद्र मोदी द्वेषापोटी वक्तव्य करण्यामुळे राहुल गांधी हे मात्र पाकमध्ये लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर आहेत. त्यामुळे भाजपाचे अनेक नेते त्यांना ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द्यावा, म्हणून पाककडे आग्रह करीत आहेत.
‘निशान-ए-पाकिस्तान’ म्हणजे काय?
‘निशान-ए-पाकिस्तान’ हा पाकचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. भारतातील भारतरत्न पुरस्काराप्रमाणेच हा पुरस्कार देऊन त्यांच्याकडे गौरवण्यात येते. १९५७ मध्ये ‘डेकोरेशन अॅक्ट’ अंतर्गत त्याची स्थापना करण्यात आली आहे. पाकच्या राष्ट्रीय हितासाठी अत्यंत विशिष्ट सेवा देणाऱ्यांना तो प्रदान केला जातो. निशान-ए-पाकिस्तान व्यतिरिक्त देशात निशान-ए-इम्तियाज आणि तमघा-ए-पाकिस्तान यांसारखेही नागरी पुरस्कार देण्यात येतात. दरवर्षी दि.१४ ऑगस्टला पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी हे पुरस्कार जाहीर केले जातात आणि दि. २३ मार्च या पाकिस्तान दिनाच्या वेळी पुरस्कारविजेत्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.
टीका करण्याचा भाजपाचा उद्देश..
भाजपाने राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी या पुरस्काराचा उल्लेख केला, म्हणून खऱ्या अर्थाने तो चर्चिला गेला. ‘ट्विटर’ वरील एका पोस्टमध्ये पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या चेहऱ्यावर गांधींचा चेहरा ओव्हरलॅप करून तयार केलेला एक फोटो मालवीय यांनी दाखवला. या फोटोसह त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी हे पाकिस्तान आणि त्यांच्या हितचिंतकांची भाषा बोलत आहेत, यात आश्चर्य नाही. भारताचे वर्चस्व सिद्ध करणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदनही केले नाही. उलट या ऑपरेशनमध्ये आपण किती विमाने गमावली, हाच प्रश्न ते विचारत आहेत. तसेच संघर्षादरम्यान किती पाक विमाने पाडण्यात आली किंवा भारतीय सैन्याने पाकच्या एअरबेसवर हल्ला केला तेव्हा किती एअरबेस नष्ट करण्यात आले, याबाबत मात्र एकदाही विचारले नाही, यापुढे त्यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख पाकधार्जिणा नेता असा केला आहे.
हेही वाचा : पिंपरी पालिका हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणार
राहुल गांधींसाठी आता पुढे काय?
मालवीय यांच्या या टीकेनंतर काँग्रेसननेही लगेचच पलटवार केला. त्यांच्या प्रवक्त्याने असे म्हटले, की त्यांचे नेते आणि काँग्रेसचे नसलेले भारताचे पहिले पंतप्रधान मोरारजी देसाई हे अजूनही असे एकमेव राजकारणी आहेत, ज्यांना हा सर्वोच्च पाकिस्तानी सन्मान देण्यात आला आहे. आणखी काही लोक या पुरस्कारासाठी पात्र आहेत. लालकृष्ण अडवाणी यांनी जिना यांना धर्मनिरपेक्ष म्हटले होते. आमंत्रित न करताही नवाज शरीफ यांच्यासोबत बिर्याणी खायला जाणारे नरेंद्र मोदी हेदेखील त्यासाठी पात्र आहेत. भाजपा आणि काँग्रेस मधील हा वाद आता टोकाला पोहोचला आहे.
काँग्रेसचीही खरपूस टीका..
काँग्रेस समितीचे संपर्क प्रमुख जयराम रमेश यांनीदेखील या पुरस्काराबाबत उल्लेख केला. “माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान निशान-ए-पाकिस्तान मिळाला. देसाईंच्या मंत्रिमंडळात अटलबिहारी वाजपेयी हे परराष्ट्रमंत्री होते, हे तरी भाजपाने लक्षात ठेवले पाहिजे, असे जयराम रमेश म्हणाले.
मोरारजी देसाईंना हा पुरस्कार का मिळाला?
१९७७ मध्ये आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत मोरारजी देसाई पंतप्रधानपदी आले. त्यावेळी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा पराभव झाला. त्यांनी जनता पक्षाच्या सरकारचे नेतृत्व केले आणि अनेक काँग्रेसविरोधी पक्षांचा समावेश त्यात होता.
मोरार्जींचा शांततेसाठी गौरव
मोरारजी देसाई यांनी पंतप्रधानपद सोडल्यानंतर बऱ्याच काळानंतर पाकिस्तान सरकारने त्यांना निशान-ए-पाकिस्तान पुरस्कार प्रदान केला. १९७१ च्या युद्धानंतर भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत करण्यासाठी देसाईंच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात (१९७७-१९७९) त्यांनी केलेल्या राजनैतिक उपाययोजना आणि घेतलेली युद्धविरोधी भूमिका यामुळे देसाई यांची निवड केली गेल्याचे इस्लामाबादकडून सांगण्यात आले. वाजपेयी परराष्ट्रमंत्री असताना इस्लामाबादला गेले होते. त्यावेळी त्यांनी दोन्ही देशांमध्ये भेटी, देवाण-घेवाण करणे, व्हिसा सुविधा उदारीकरण करणे आणि एकमेकांच्या फायद्यासाठी व्यापारात सुधारणा करणे यांसारख्या योजनांची घोषणा केली होती.
देसाईंना दोन्ही देशांचे सर्वोच्च पुरस्कार..
भुट्टो सरकारने त्यांच्यासाठी निशान-ए-पाकिस्तान जाहीर केल्यानंतर काँग्रेसने देसाईंना पुरस्कार स्वीकारू नये, अशी विनंती केली होती. असा आक्षेप असतानाही देसाई यांनी १९९० मध्ये तो पुरस्कार स्वीकारला. १९९१ मध्ये मोरारजी देसाईंना भारतरत्न प्रदान करण्यात आला. अशा प्रकारे देसाई दोन्ही देशांमधील सर्वोच्च नागरी सन्मानाचे मानकरी ठरले आहेत.
इतर भारतीयही मानकरी..
२०२० मध्ये इम्रान खान सरकारने जम्मू-काश्मीरचे फुटीरतावादी नेते व हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांना पाकला पाठिंबा देण्याचे आणि काश्मीरच्या हिताच्या वचनबद्धतेसाठी या पुरस्काराने सन्मानित केले होते. २०२३ मध्ये आताच्या शाहबाज शरीफ सरकारने दाऊदी बोहरा समुदायाचे आध्यात्मिक प्रमुख सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांना या सन्मानाने गौरविले होते.
राहुल गांधी यांची क्षमता..
सतत भारतविरोधात भूमिका घेणे, भारताच्या राजकारण्यांना सहकार्य न करता त्यांना अडचणीत आणणे आणि चीन किंवा पाकिस्तानला पूरक अशी भूमिका घेणे, हे आता राहुल गांधी यांचे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे त्यांना आज ना उद्या हा पुरस्कार दिला जाणारच आहे. पण, ते त्यांचे कार्यकर्ते मान्य करतील का? हा खरा प्रश्न आहे !