संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास स्थगिती द्यावी
पिंपरी-चिंचवड शहर भाजपा चिटणीस सचिन काळभोर यांची पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी

पिंपरी-चिंचवड : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सालाबादप्रमाणे यंदा पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील निगडी येथे १९ जून २०२५ रोजी येणार असून हजारो वारकरी बांधव संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्ताने देहू ते पंढरपूर पायी वारी करत असतात. या पार्श्वभूमीवर निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू आहे. त्याठिकाणी रस्ता अरुंद असून लोखंडी पत्रे कंपाऊंड निगडी भक्ती शक्ती उड्डाणपूल ते पिंपरी मोरवाडी दरम्यान मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक १० जून २०२५ रोजी निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम स्थगिती देण्यात यावी, या मागणीचे निवेदन पिंपरी-चिंचवड शहर भाजपा चिटणीस सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पुणे जिल्हाधिकारी यांना इमेलद्वारे पाठवले आहे.
सदर निवेदनात काळभोर यांनी म्हटले आहे की, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्ताने हजारो वारकरी बांधव देहू ते पंढरपूर पायीवारीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत येत असतात. पालखी महामार्गावर रस्ता अरुंद असून त्या ठिकाणी मेट्रो रेल्वे प्रकल्प काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्या संदर्भात पुणे जिल्हाधिकारी यांनी ताबडतोब दखल घेऊन संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्ताने निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम स्थगिती देण्यात यावी.
हेही वाचा – ‘छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा तेजाने, स्वाभिमानाने, भव्यतेने उभा झाल्याचा आनंद’; मुख्यमंत्री फडणवीस
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात यावा तसेच वारकरी बांधवांना रस्त्यावर सुलभ शौचालय पाणी पुरवठा आरोग्य संदर्भात सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी वारकरी बांधवांना मुक्काम स्थळी चांगल्याप्रकारे सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. जेणेकरून वारकरी बांधवांची गैरसोय होणार नाही ह्याची दक्षता घेण्यात यावी. मोठ्या वाहनांना निगडी ते पिंपरी महामार्गावर बंदी घालण्यात यावी. रस्त्यावर लाईट सुरू करण्यात याव्यात. ज्या ठिकाणी मेट्रो रेल्वे काम सुरू आहे, त्या ठिकाणी लोखंडी पत्रे कंपाऊंड केले आहे, त्या संदर्भात दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. निगडी भक्ती शक्ती उड्डाणपूल ते पिंपरी मोरवाडी चौक या महामार्गावर ट्रॅफिक वॉर्डन नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरून वाहतूक कोंडी समस्या निर्माण होणार नाहीत. याची दक्षता घेण्यात यावी, तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्ताने पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब स्वतः दखल घेऊन संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्ताने वारकरी बांधवांना, सुलभ शौचालय व पाणी टँकर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात यावेत. वारकरी बांधवांना अन्नदान व्यवस्था सामाजिक संघटना संस्था व मंडळे यांच्या मार्फत सहभागी करून घेण्यात याव्यात. जेणेकरून वारकरी बांधवांना भोजन व्यवस्था चांगल्याप्रकारे करण्यात येतील. सुरक्षा संदर्भात विशेष व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.